‘तीन अडकून सीताराम’मधील ‘दुनिया गेली तेल लावत’ हे एनर्जेटिक गाणे प्रदर्शित

बुधवार, 20 सप्टेंबर 2023 (15:32 IST)
‘दुनिया गेली तेल लावत’ हे तीन बिनधास्त मित्रांचे बिनधास्त गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. चित्रपटाच्या अफलातून ट्रेलरनंतर आता 'दुनिया गेली तेल लावत' हे एनर्जेटिक  गाणे सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. परदेशात व्हेकेशनला गेलेल्या या तीन मित्रांची काय काय धमाल चालू आहे, हे या गाण्यातून दिसतेय. दुनियाची पर्वा न करता बेफीकर असलेले हे मित्र व्हेकेशनचा पुरेपूर आनंद लुटताना दिसत आहेत.

हे गाणे जयदीप वैद्य, गोपाळ ठाकरे, हृषिकेश रानडे आणि आरती केळकर या युवा गायकांनी गायले आहे. तर ॲग्नेल रोमन यांनी हे गाणे संगीतबद्ध केले असून वैभव जोशी या गाण्याचे गीतकार आहेत. वैभव तत्ववादी, अलोक राजवाडे, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता माळी यांच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन फुलवा खामकर यांनी केले आहे.

दिग्दर्शक ऋषिकेश जोशी म्हणतात, “ ‘दुनिया गेली तेल लावत’ या गाण्याचे संगीतकार, गीतकार, गायक, कलाकार सर्वांनीच या गाण्याच्या शूटिंग दरम्यान खूप धमाल केली आहे. मला एक किस्सा येथे आवर्जून सांगावासा वाटतो. या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान लंडनच्या राणीचे निधन झाले होते आणि आम्हाला आमच्या नियोजनानुसार चित्रीकरण पूर्ण करायचे होते. चित्रीकरणस्थळांवर जरा मर्यादा येत होत्या. आयत्या वेळी आम्हाला नवीन लोकेशन्स शोधावी लागली. त्यामुळे अगदी मोजक्याच स्टाफसोबत आम्हाला लपून छपून चित्रीकरण करावे लागत होते आणि या सगळ्या परिस्थितीत आम्ही ‘दुनिया गेली तेल लावत’ या गाण्याचे बोल चित्रीकरणादरम्यान खरे करून दाखवले.’’

सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. आणि नितीन वैद्य प्रोडक्शन प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन हृषिकेश जोशी यांनी केले आहे. २९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि नितीन प्रकाश वैद्य निर्माते आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती