सुबोध भावेने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. तो सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. गेल्या काही दिवसांपासून सुबोध भावे हा त्याच्या विविध चित्रपटांमुळे चर्चेत आहे. सुबोध भावे हा वाळवी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत आहे. नुकतंच सुबोध भावेने एका मुलाखतीत स्वत:चीच खिल्ली उडवली आहे.
सुबोध भावेने हर हर महादेव या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. त्यानंतर त्याने या पुढे ऐतिहासिक बायोपिक करणार नाही अशी भूमिका मांडली होती. त्यानंतर आता सुबोध भावे प्रसिद्ध दिग्दर्शक परेश मोकाशी यांच्या वाळवी चित्रपटात झळकणार आहे. यानिमित्ताने या चित्रपटाच्या टीमने नुकतंच दैनिक बोंबाबोंब या युट्यूब चॅनलला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत सुबोधने स्वत:चीच खिल्ली उडवली.
“मी सर्वात आधी त्या चित्रपटाला बायोपिक म्हणून होकार दिला. वाळवीचं बायोपिक असं मला वाटलं. माणसांवरचे बायोपिक झाले आणि आता प्राण्यांवरचे बायोपिक सुरु झाले आहेत. त्याची सुरुवात माझ्यापासून होणार आहे. त्यामुळे मी तो चित्रपट स्वीकारला. पण त्यानंतर त्यात असं काहीही नाही, हे लक्षात आलं. तोपर्यंत मी या चित्रपटात काम केलं होतं. ट्रेलरमध्ये मी तुम्हाला दिसलोच आहे”, असे सुबोध भावेने म्हटले.
दरम्यान झी स्टुडिओज आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी वाळवीची निर्मिती केली आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा आणि सवांद परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी यांचे आहेत. यात स्वप्नील जोशी, सुबोध भावे, अनिता दाते, शिवानी सुर्वे हे कलाकार झळकणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर चांगलाच हिट ठरताना दिसत आहे. यात हे कलाकार एका वेगळ्याच अंदाजात दिसत असून त्यांच्या व्यक्तिरेखा चित्रपटाबद्दलची उत्कंठा अधिकच वाढवणाऱ्या आहेत. वाळवी हा मराठीतील पहिला थ्रिलकॅाम चित्रपट आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor