पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’च्या (पिफ) नोंदणी प्रक्रियेला सुरुवात

मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021 (07:53 IST)
पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 4 ते 11 मार्च दरम्यान होणा-या 19 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’च्या (पिफ) नोंदणी प्रक्रियेला सुरुवात होत आहे. यावर्षी चित्रपटगृहा बरोबरच ऑनलाईन माध्यमातून महोत्सव पार पडणार असून या दोन्हींसाठी नोंदणी प्रक्रिया ही वेगवेगळी असणार असल्याची माहिती पुणे फिल्म फाउंडेशनच्या वतीने कळवण्यात आली आहे.
 
महोत्सवाचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन मंगळवार (दि.16) तर, गुरुवार (दि.25) पासून स्पॉट रजिस्ट्रेशन करता येणार आहे. ऑनलाईन नोंदणीचे शुल्क हे सर्वांसाठी 500 रुपये इतके असेल, यामध्ये निवडक 26 चित्रपट दाखविले जाणार आहेत. याबरोबरच चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी नोंदणी शुल्क हे सर्वांसाठी 600 रुपये इतके असणार असून यामध्ये 150 चित्रपटांचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येणार आहे.
 
यावर्षी सेनापती बापट रस्त्यावरील पीव्हीआर, लॉ कॉलेज रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि कॅम्प परिसरातील आयनॉक्स या 3 ठिकाणी 7 स्क्रीन्सवर महोत्सवातील चित्रपट दाखविले जाणार असल्याची माहिती देखील फाउंडेशनने कळविली आहे. वर नमूद केल्याप्रमाणे http://www.piffindia.com या संकेतस्थळावर ऑनलाईन रजिस्ट्रेशन हे 16 फेब्रुवारी पासून उपलब्ध असणार आहे. तर 25 फेब्रुवारी पासून सुरू होणारे स्पॉट रजिस्ट्रेशन हे पीव्हीआर (सेनापती बापट रस्ता), राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (लॉ कॉलेज रस्ता) आणि आयनॉक्स (कॅम्प) या ठिकाणी सकाळी 11 ते सायंकाळी 7.30 पर्यंत असेल. दोन्ही रजिस्ट्रेशन पद्धतीसाठी मर्यादित जागा उपलब्ध असून चित्रपट प्रेमींनी लवकरात लवकर नोंदणी करावी, असे आवाहन फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. कोरोना काळात सरकारने लागू केलेल्या सर्व अटी व नियमांचे पालन हे चित्रपटगृहात करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती