Pune :ज्येष्ठ कलावंत अशोक सराफांना मिळणार पद्मश्री पुरस्कार! सुधीर मुनगंटीवार म्हणाले...

सोमवार, 21 ऑगस्ट 2023 (12:48 IST)
पुण्यात ज्येष्ठ रंगकर्मी अशोक सराफ यांना कीर्ति सौरभ प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार-2023 बालगंधर्व रंगमंदिर येथे मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी महाराष्ट्र शासनातर्फे पद्म पुरस्कारासाठी अशोक सराफ यांच्या नावाची शिफारस केल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
 
बालगंधर्व रंगमंदिर येथे मुनगंटीवार यांच्या हस्ते ज्येष्ठ रंगकर्मी अशोक सराफ यांना कीर्ति सौरभ प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार-2023 प्रदान करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

सुधीर मुनगंटीवार यांना पद्म पुरस्कारांसाठी नावाची शिफारस करण्याची जबाबदारी  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. कोणाचं नाव सुचवावं असा प्रश्न त्यांना पडला होता. पण बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार वितरण अनारोहाच्या कार्यक्रमात त्यांचा शोध थांबला असल्याचं ते म्हणाले. अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयातून आनंदाचा झरा लोकांपर्यंत पोहोचवला आहे. त्यांना विनोदाचा बादशहा, विनोदवीर म्हटले जाते. समोरच्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचे, प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करण्याचे कठीण कार्य त्यांनी अनेक वर्ष केले.
 
त्यांनी आपल्या अभिनयातून समाजातील संस्कारही प्रकट केला, तर दुसरीकडे प्रशासनातील दोषही तेवढ्याच ताकदीने मांडले. त्यांच्या अभिनयात शब्दफेकण्याची ताकद आहे. अशोक मामांनी आपल्या अभिनयामुळे लोकांच्या मनात घर केले आहे. अशोक सराफ यांची कामगिरी सतत उंचावत गेली. त्यांनी जीवनात यशाची अनेक शिखरे गाठली. त्यांची नाटके हमखास यशस्वी ठरायची. त्यांचे अनेक चित्रपट, नाटके यशस्वी ठरले.

कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, ज्येष्ठ मूर्तीशास्त्र अभ्यासक गो. ब. देगलूरकर, भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत, प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्रनाथ घाटे, अभिषेक जाधव आदी उपस्थित होते.
आता येत्या काही दिवसांत ज्येष्ठ रंगकर्मी अशोक सराफ यांना पद्म पुरस्कार मिळण्याची शक्यता वर्तवली आहे
 
 Edited by - Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती