एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील जागावाटप 2019 प्रमाणेच असेल असा खुलासा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांनी केला आहे. शिवसेनेने गेल्यावेळी 48 पैकी 22 जागा लढवून 18 जागा जिंकल्या होत्या. तर भाजपने 26 जागा लढवून 23 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे यावेळीही तशीच व्यवस्था असेल. तसेच २०२४ च्या निवडणुकीसाठी पक्षाने आधीच तयारी सुरू केली असल्याचा खुलासा खासदार गजानन कीर्तीकर यांनी केला आहे.
दरम्यान, किर्तीकरांनी अधोरेखित केलेल्या या मुद्द्यावर भाजपने अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे सांगितले आहे. भाजप नेते आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी असा कोणताही फॉर्म्युला तयार झाला नसल्याचे सांगताना, “एकनाथ शिंदे यांच्या मागण्या मान्य केल्या जाणार नाहीत, असे भाजपच्या एकाही नेत्याने म्हटलेले नाही. लोकांच्या हिताचे रक्षण करणारे सरकार देण्यासाठी शिंदे यांनी भाजपशी हातमिळवणी केली. त्यांच्या मागण्यांचा आदर केला जाईल. आधी बाळासाहेब ठाकरे आणि आता एकनाथ शिंदे नेतृत्वाखालील शिवसेनेचा भाजपने नेहमीच आदर केला आहे.” असे मंत्री मुनगंटीवार यांनी राजभवनात पत्रकारांना सांगितले.