“शासन आपल्या दारी” योजनेतून जिल्ह्यातील एक लाख लाभार्थ्यांना लाभ देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शुक्रवार, 26 मे 2023 (08:41 IST)
“शासन आपल्या दारी” या योजनेच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील किमान एक लाख लाभार्थ्यांना शासन योजनेचा लाभ प्रत्यक्ष स्वरूपात देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
 
रत्नागिरी जिल्ह्यातील “शासन आपल्या दारी” या लोकाभिमुख योजनेच्या शुभारंभाच्या वेळी ते बोलत होते.
यावेळी  जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत, बंदरे व खनीकर्म मंत्री दादाजी भुसे, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, आमदार रवींद्र फाटक, माजी आमदार सदानंद चव्हाण, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण पवार, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पूजार, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, आपला उद्देश प्रामाणिक असला म्हणजे सर्व बाजूने लोक सोबत जोडले जातात. “शासन आपल्या दारी” हे अभियान देशात विक्रमी ठरेल आणि महाराष्ट्राचे उदाहरण देशासमोर राहील याची मला खात्री आहे. “शासन आपल्या दारी” हे एक क्रांतिकारी अभियान राज्यात सुरु झाले आहे. १३ मे रोजी पाटण येथून संपूर्ण राज्यात या अभियानाची सुरुवात झाली. आज २५ मे म्हणजे केवळ बारा दिवसांत लाखो लाभार्थींची नोंद यात होत आहे हे विशेष आहे.

‘शासन आपल्या दारी’ या अभियानावर मुख्यमंत्री सचिवालयाचे पूर्ण नियंत्रण आणि देखरेख आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, वीर सावरकर या महापुरुषांची भूमी असलेल्या रत्नागिरीत ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात येत आहे, याचा आनंद होत आहे.

या अभियानाचा लाभ अधिकाधिक लोकांना व्हावा म्हणून आपण आता माहिती तंत्रज्ञानाची मदत घेतो आहोत. महालाभार्थी या पोर्टलवर नोंदणी करून आपण योजनांचा लाभ घेऊ शकता. जिल्ह्यातील एमएससी आयटी केंद्रे, सीएससी केंद्रे तसेच कॉम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मधून तेथील स्वयंसेवकांची मदत घेऊन आपण नोंदणी करू शकता आणि योजनांचा लाभ घेऊ शकतात. हे अभियान यशस्वी करण्यासाठी संपूर्ण प्रशासन यंत्रणा युद्धपातळीवर, प्रत्यक्ष क्षेत्रावर उतरली पाहिजे. अशा सर्व यंत्रणांना सूचना होत्या. आज ग्राम सेवक, तलाठी, प्रांत अधिकारी स्वत: गावोगावी जाऊन नागरिकांना भेटत आहेत आणि लाभ देत आहेत, योजनांची माहिती देत आहेत, असे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी प्रशासकीय यंत्रणेचे कौतुक केले.
 
Edited by -Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती