मुंबईतील मुलुंडच्या महाकवी कालिदास नाटय़मंदिराच्या आवारात ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर यांनी श्रीफळ वाढवून ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलनाचे उद्घाटन झाले. तब्बल २५ वर्षांनंतर मुंबईत प्रथमच ६० तास नाटय़संमेलनाचा श्रीगणेशा झाला असून या ऐतिहासिक उद्घाटन सोहळय़ासाठी प्रचंड गर्दी झाली होती. आकर्षक, भव्य असे रंगीबेरंगी व्यासपीठ, नाटय़ परंपरेला साजेसे नेपथ्य आणि नव्या-जुन्या कलाकारांचा अपूर्व संगम यानिमित्ताने झाला.
ज्येष्ठ गायिका व अभिनेत्री फय्याज यांच्या सोबत नवोदित कलाकारांनी गायलेल्या नांदीने सारे वातावरण प्रसन्न झाले. व्यासपीठावर अध्यक्षा कीर्ती शिलेदार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, नाटय़संमेलनाचे मावळते अध्यक्ष जयंत सावरकर, स्वागताध्यक्ष व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, नाटय़ परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी आदी उपस्थित होते. यावेळी जेष्ठ अभिनेते मोहन जोशी यांचा विशेष सत्कार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आला. सई परांजपे, विजया मेहता, प्रशांत दामले यांचाही नाटय़ परिषदेच्या वतीने गौरव करण्यात आला.