प्रेक्षक ज्याची आतुरतेने वाट पाहात होते तो क्षण अखेर जवळ आला असून 'लोच्या झाला रे' चित्रपटाचा ट्रेलर दणक्यात लाँच करण्यात आला. या सोहळ्याला अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, वैदेही परशुरामी, रेशम टीपणीस यांच्यासह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. याव्यतिरिक्त या चित्रपटात सयाजी शिंदे, विजय पाटकर, प्रसाद खांडेकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. लोच्या झाला रे ४ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांसोबतच कलाकारही चित्रपट प्रदर्शनासाठी अतिशय उत्सुक आहे.
सुरेश जयराम यांच्या नाटकावर आधारित 'लोच्या झाला रे'मध्ये सयाजी शिंदे यांचा भाचा, अंकुश चौधरीच्या बायकोला भेटायला लंडनला येतात आणि तिथूनच सगळा लोच्या व्हायला सुरुवात होते. चित्रपटात वैदेही परशुरामी नेमकी अंकुशची बायको आहे का सिद्धार्थची? याबाबत झालेला गोंधळ आपल्याला यात पाहायला मिळत आहे. या सगळ्या गोंधळात इतर कलाकारांचाही सहभाग असल्याचे आपल्याला ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. या सगळ्या धावपळीत नक्की कोणाच्या आयुष्यात लोच्या होतोय, या सगळ्याची उत्तरे आपल्याला चित्रपट पाहिल्यावरच मिळतील .
चित्रपटाबद्दल मुंबई मुव्ही स्टुडिओजचे नवीन चंद्रा म्हणतात, लोच्या झाला रे आमचा पहिला मराठी चित्रपट असून आम्ही सर्वच खूप उत्सुक आहोत. या चित्रपटासाठी आम्ही अनेक गोष्टी करत आहोत. प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता पाहता, त्यांच्या सोयीसाठी बुक माय शोवर आम्ही दोन आठवडे आधीच शो बुकिंग उपलब्ध करत आहोत. हे पहिल्यांदाच कुठल्या मराठी चित्रपटाबाबत घडत असेल. चित्रपटात सगळे कसलेले कलाकार आहेत. प्रेक्षक हा कौटुंबिक धमाल चित्रपट नक्कीच एन्यॅाय करतील.
दिग्दर्शक पारितोष पेंटर म्हणतात, हा चित्रपट माझ्यासाठी फार जवळचा आहे, कारण या चित्रपटाच्या निमित्ताने मी दिग्दर्शक म्हणून पदार्पण करीत आहे. तसेच या चित्रपटासाठी मला तगडी स्टारकास्ट लाभली असून आम्ही ऑनस्क्रिन तुफान धमाल केली आहे आणि तशीच धमाल ऑफस्क्रिनही केली आहे. हे सगळं माझ्या कायम आठवणीत राहिल. एक गोड आठवण मला तुम्हाला सांगाविशी वाटते. सयाजी सरांनी चित्रीकरणादरम्यान स्वतः स्वयंपाक बनवण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही सर्वांनीच त्याचा आस्वाद घेतला. आमची ही पडद्यामागील मैत्री, प्रेम, केमिस्ट्री तुम्हाला पडद्यावर पाहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे.
पारितोष पेंटर आणि रवी अधिकारी यांनी 'लोच्या झाला रे' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून छायाचित्रणाची धुरा संजय मेमाणे यांनी सांभाळली आहे. नवीन चंद्रा, नितीन केणी, पारितोष पेंटर आणि शांताराम मनवे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे तर मंगेश रामचंद्र जगताप कार्यकारी निर्माता आहेत. लंडनमध्ये चित्रित झालेला हा चित्रपट मुंबई मुव्ही स्टुडिओज प्रस्तुत आयडिया दि एंटरटेनमेंट कंपनी आणि अभिनय मुंबई प्रोडक्शन अंतर्गत बनवण्यात आला असून वितरणाचे काम यूएफओ मुव्हीझने पाहिले आहे.