ANANYA - ’अनन्या'मधून हृता दुर्गुळे झळकणार मोठ्या पडद्यावर

बुधवार, 18 ऑगस्ट 2021 (19:27 IST)
मराठी मालिका आणि नाटकातून घराघरात पोहोचलेली हृता दुर्गुळे आता मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाली आहे. ''शक्य आहे. तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे!'' अशी टॅगलाईन असलेल्या 'अनन्या' या चित्रपटातून हृता सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत, ड्रीमव्हिवर एंटरटेनमेंट निर्मित आणि रवी जाधव फिल्मच्या सहकार्याने भेटीला येणाऱ्या 'अनन्या' या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर झळकले आहे. हृता दुर्गुळे हिची प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रताप फड यांचे असून ध्रुव दास, रवी जाधव आणि संजय छाब्रिया यांची निर्मिती आहे. तर चित्रपटाला समीर साप्तीस्कर यांचे संगीत लाभले आहे. 
    
पोस्टरमध्ये हृताचे वेगळेच रूप पाहायला मिळत आहे. तिच्या डोळ्यांत एखादे ध्येय प्राप्त करण्याचे भाव दिसत असून येणाऱ्या संकटांवर ती यशस्वीरित्या मात करेल, हा विश्वासही आहे. यापूर्वीच हृताने आपले अभिनयकौशल्य सिद्ध केले असून 'अनन्या' या व्यक्तिरेखेतूनही ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल यात शंका नाही. 
 
'अनन्या'बद्दल हृता दुर्गुळे म्हणते, ''मी खूपच खुश आहे. खरं तर या क्षणाची मी खूपच आतुरतेने वाट पाहात होते. कारण 'अनन्या'च्या माध्यमातून मी चित्रपटात पदार्पण करत आहे. कोरोनाचा शिरकाव होण्याआधीच या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते आणि मागील दीड -दोन वर्षांत सगळेच अडकून होते. मुळात दिग्दर्शक, निर्माता यांच्यासह आमच्या सर्वांचीच इच्छा होती की, 'अनन्या' थिएटरमध्येच रिलीज व्हावा. त्याचीच आम्ही वाट पाहात होतो. हळूहळू परिस्थिती निवळत असतानाच आता 'अनन्या'चे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. याचा आनंद आम्हाला सगळ्यांनाच आहे.''

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती