सावित्रीबाई फुलेंनी महाराष्ट्रातील पुरोगामीत्वाचा नवा पाया रचला होता. आधुनिकतेचा बदल विचारांनी स्वीकारला होता. त्यांनी संघर्षाची मशाल हाती घेतली परंतु त्याची धग जनमानसाच्या मनात आजही धगधगते का ?
आजच्या आधुनिक समाजात सावित्रीचा वारसा चालवणारे, महिला सक्षमीकरणाचे नारे देणारे, महिलांच्या सबलीकरणाच्या हेतूने पुरोगामी चळवळ चालवणारे खरंच पुरोगामी आहेत का ? आणि जर आहेत तर आजच्या काळात ही महिलांची अशी स्थिती, अशी अवस्था का ? मग नेमकी पुरोगामी असण्याची व्याख्या काय ?
आम्ही थिएटर ऑफ रेलेवन्सचे रंगकर्मी
रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित - दिग्दर्शित "लोक-शास्त्र सावित्री" या युगपरिवर्तक नाटकातून मृतावस्थेत असलेल्या समाजात सांस्कृतिक चेतनेची ठिणगी पेटवत आहोत. सांस्कृतिक सृजनकार या नवीन संकल्पनेने आम्ही एका नव्या पर्वाची सुरुवात करत आहोत.
शेण आणि दगडांचा मार खाऊन सावित्रीने अस्पृश्यता आणि अज्ञानाची भिंत तोडली, तिची ही ओळख प्रत्येकाला माहीत आहे. ही सावित्री आपण सगळ्यांनीच ऐकली, वाचली आहे. "लोक-शास्त्र सावित्री" हे नाटक त्या सावित्री विषयी बोलते जी माझ्या, तुमच्या आपल्या प्रत्येकाच्या आत जन्म घेते. मी माणुसकीला जगवण्यासाठी जिथे पुरोगामी पुढाकार घेते तिथे ही सावित्री माझ्या आत जन्म घेते. समाजाने ठरवलेल्या चौकटीतून बाहेर पडून मी माझे वेगळे अस्तित्व निर्माण करते, तिथे ही सावित्री जन्म घेते. सावित्रीची समाजमान्य आणि माहीत असलेली भूमिका व जीवनयात्रा हे नाटक दाखवत नाही, तर "सावित्री आपल्या आत कुठे आहे ?" याचा शोध घेण्यास उत्प्रेरीत करते.
थोर व्यक्तींनी, विचारवंतांनी त्यांच्या काळात समाज निर्माणाचे काम केले.
त्या विचारवंतांना महिमा मंडीत करून महान केले गेले,आपल्याकडे त्यांची जयंती,पुण्यतिथी अगदी जोशात साजरी केली जाते, त्यांच्या फोटोवर हार चढवले जातात, मानाचे मुजरे केले जातात ,परंतु त्यांचे तत्व अंगीकारले जात नाहीत. त्यांच्या तत्वाच्या मार्गावर चालणे अभावानेच होते. हेच कारण आहे की आजही आपला समाज खऱ्या अर्थाने पुरोगामी नाही.
आम्ही या समाज प्रवर्तकांना विचार स्वरूपात पाहतो. त्यांचे तत्त्व आपल्या कला प्रतिबद्धतेने जगतो.सावित्री बाई फुले एक जिवंत चळवळ, अमूर्त दूरदृष्टीचे मूर्त आंदोलन. सामाजिक अन्यायातून मुक्तीसाठी भारतीय संविधानाच्या सार्वभौम व समतावादी मूल्यांना त्यांनी त्याकाळात रुजवले. सावित्रीचा संघर्ष, पितृसत्ताक समाजा विरुध्दचा बंड, जातीय विषमता मोडीस काढण्याचा वैचारिक पुढाकार या सर्व पैलूंना जागतिकीकरणाने जाणीवपूर्वक केवळ शिक्षणाच्या कुंपणात मर्यादित केले. त्यांची खरी ओळख समाजापर्यंत पोहचूच दिली नाही. म्हणून परंपरेच्या नावाखाली आज ही सामाजिक अन्याय आणि शोषण सुरु आहे, त्याला हे नाटक उजागर करते.
1834 काळापासून सुरू झालेले सावित्रीचे सांस्कृतिक प्रबोधन जागतिकीकरणाने संपवले आहे. सावित्रीच्या प्रतिरोधाला प्रचारकी व्यक्तिवादाचे स्वरूप देऊन अलगदपणे सर्वसामान्य केले आहे.
सावित्रीचा जो प्रतिरोध होता त्याची ताकद संपवली आहे. आणि हा प्रतिरोधाचा न्याय पताका घेऊन, "थिएटर ऑफ रेलेवन्स" नाट्य सिद्धांत "लोक- शास्त्र सावित्री" या नाटकाच्या माध्यमातून पुन्हा सावित्रीच्या महत्वाला, तिच्या विचाराला, तिच्या तत्वाला जनमानसात जागवत आहे.
"लोक-शास्त्र सावित्री" हे नाटक सामाजिक रूढी व्यवस्थेला केवळ प्रश्नच नाही विचारत तर त्या व्यवस्थेला बदलण्यासाठी त्याच्या मुळाशी जाऊन समाधानाचे शोध घेते. थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य तत्वानुसार कलाकार हा समाजाचा आरसा असतो जो सत्य दर्शावतो आणि सत्याचा शोध म्हणजे काळाचे उत्खनन म्हणजे पिढ्यांपिढ्या खोदून काळाच्या मुळाशी जाऊन समाधान मिळवते. हे नाटक पितृसत्तात्मक, सामंतवादी आणि धर्मवादी शोषणाच्या मुळावरच प्रहार करते.
"लोक-शास्त्र सावित्री" हे नाटक शिक्षित किंवा अज्ञानी या भेदाला खोडते. असं म्हंटल जातं कि माणूस शिक्षणाने माणूस होतो पण खरंच तसं घडतं का ?शिक्षण माणसाला न्यायसंगत करते का ? आणि जर तसं आहे तर मग बहिणाबाई कोण होत्या ? बहिणाबाई तर अशिक्षित राहून हि माणूस म्हणून जगल्या. सावित्रीबाई आणि बहिणाबाई हे दोन ध्रुव आहेत. एक आहे विचार स्वरूपात अस्तित्व निर्माण करण्याचे आणि दुसरे आहे, जीवनदृष्टीने तत्व जागवण्याचे व या दोघांचा एकत्र येण्याचा बिंदू आहे माणुसकी !
सावित्री सारखे जगण्याचे निर्णय घेताना आपल्या प्रत्येकाचे तळ्यात मळ्यात होते. माणूस म्हणून जगण्याची इच्छा असूनही आपण पुढाकार घेत नाही. त्या पुढाकारासाठी हे नाटक उत्प्रेरीत करते.हे नाटक माणुसकीची न्यायसंगत, विवेकसंमत आणि वैचारिक दृष्टी प्रदान करते, मानवीय अस्तित्वाचे जग प्रस्थापित करण्याची दृष्टी देते !
एक कलाकार म्हणून जगण्यासाठी सर्वात महत्वाचं आहे,कलेची साधना आणि स्वतःच्या तत्वावर काम करणे.
आणि व्यक्ती म्हणून जगण्यासाठी महत्वाचे आहे स्वतःच्या आयुष्याची सूत्रे आपल्या हाती असणे आणि निर्णय घेण्याची क्षमता असणे. माझ्या या दोन्ही आयामांना "थिएटर ऑफ रेलेवन्स" नाट्य सिद्धांताने बळकट केले. माझ्या नाट्यकलाकृतीतून कलासत्व प्रदान केले.प्रेक्षकांतही या कला सत्वाने त्यांच्या माणूस म्हणून जगण्याच्या जाणिवेला जागृत केले.
आम्ही थिएटर ऑफ रेलेवंसचे शुभचिंतक आणि अभ्यासक, रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित