'प्लॅनेट टॅलेंट’च्या यादीत गायत्री दातार

गुरूवार, 21 जानेवारी 2021 (15:30 IST)
‘तुला पाहते रे’ या लोकप्रिय मालिकेतून ईशा अर्थातच अभिनेत्री गायत्री दातार घराघरात पोहचली. तिच्यातील सहजसुंदर अभिनयाच्या जोरावर अल्पावधीतच ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. त्यानंतर ‘युवा डान्सिंग क्विन’ या डान्स रिॲलिटी शोच्या माध्यमातून आपल्या अदाकारीने आणि नृत्यकौशल्यातून तिने प्रेक्षकांना भुरळ घातली. ‘निम्मा शिम्मा राक्षस’ या नाटकातही तिने उत्कृष्ठ कामगिरी बजावली. गायत्री सध्या ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून आपल्या विनोद बुद्धीने आणि कॉमेडीच अचूक टायमिंग साधत अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवते. अभिनय, कॉमेडी आणि नृत्य अशी बहुरंगी काम करणारी ही हरहुन्नरी अभिनेत्री आता बहुचर्चित ‘प्लॅनेट मराठी'च्या 'प्लॅनेट टॅलेंट'चा एक भाग बनली आहे.

चित्रपट निर्मिती असो, वा आगामी ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’... ‘प्लॅनेट मराठी’ हे नाव या ना त्या कारणांनी सध्या मनोरंजनविश्वात चर्चेचा विषय बनलं आहे. ‘प्लॅनेट मराठी’चा महत्त्वपूर्ण भाग असलेल्या ‘प्लॅनेट टॅलेंट (प्लॅनेट टी) बरोबर आजवर अनेक नामवंत चेहरे जोडले गेले आहेत. अभिनेत्री अमृता खानविलकर, सायली संजीव, शिवानी बावकर, अभिनेता निखिल चव्हाण यांच्यासह दिग्दर्शक संजय जाधव ही प्लॅनेटशी जोडले गेले आहेत. तर महाराष्ट्राचा एनर्जेटिक स्टार सिद्धार्थ जाधवही नुकताच ‘प्लॅनेट टॅलेंट’बरोबर जोडला गेला आहे. आता अभिनेत्री गायत्री दातार हे नावही ‘प्लॅनेट टॅलेंट’शी जोडलं जाऊन येत्या काळात दिमाखात झळकणार यात शंका नाही. 

'प्लॅनेट टॅलेंट'मधील तिच्या सहभागाबद्दल गायत्री म्हणते, ''खरं सांगायचं... तर 'प्लॅनेट मराठी'च्या कुटुंबाचा मीही एक भाग झाल्याचा मला खूपच आनंद आहे. मी कुटुंब यासाठी म्हणतेय, की आपल्या प्रत्येक गोष्टीत आपल्याला कुटुंबाचा पाठिंबा, आधार असतो. चांगल्या-वाईट परिस्थितीत आपले कुटुंब आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असतं आणि असचं माझं 'प्लॅनेट' सोबत जिव्हाळ्याच नातं आहे. माझ्या कारकिर्दीच्या प्रत्येक टप्प्यात 'प्लॅनेट मराठी' माझ्यासोबत असेल याची मला खात्री आहे. या कुटुंबासोबत अनेक दिग्गज जोडले गेले आहेत त्यामुळे सगळ्यांनी एकत्र येऊन काहीतरी चांगले साध्य करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. मी खूप नशीबवान आहे, की मी 'प्लॅनेट टॅलेंट'चा एक भाग आहे.''
 
गायत्री सध्या सध्या तिच्या 'बोल्ड अँड ब्युटीफुल' फोटोशूटमुळे आणि छोट्या पडद्यावरील तिच्या विविध कामांमुळे चर्चेत आहे. परंतु, अभिनयासोबतच तिला ऍडव्हेंचरमध्ये अधिक रस आहे. अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंगमधून तिने गिर्यारोहणाचे धडे घेतले आहेत. पुण्यातील एका ट्रेकिंग ऑर्गनायझेशनमध्ये तिने ट्रेक लीडर म्हणूनही काम केले आहे. गिर्यारोहणाचे प्राथमिक धडे घेतल्यानंतर आता गायत्रीला माउंटेनिअरिंगचा पुढील अभ्यासक्रमही पूर्ण करायचा आहे.  अशाप्रकारे मालिका, रिॲलिटी शो, नाटक या विविध माध्यमांमधून आपले अभिनयकौशल्य दाखवल्यानंतर आता गायत्री डिजिटल प्लॅटफॉर्मवर येण्यासाठी सज्ज झाली आहे. याव्यतिरिक्त गायत्री एका चित्रपटातून आणि विनोदी नाटकातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परंतु, ‘प्लॅनेट टॅलेंट’बरोबर जोडली जाऊन गायत्री कोणत्या नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणारं हे बघणं उत्सुकतेच असेल.

प्लॅनेट मराठीचा विस्तार दिवसागणिक वाढत आहे. प्रादेशिक मनोरंजनापलीकडील दूरदृष्टी ठेवत मराठीसाठी निर्माण केलेलं हे डिजिटल व्यासपीठ प्रेक्षकांकडूनही तितकच पसंत केलं जाईल असा मला विश्वास आहे. हल्लीच लोकप्रिय अभिनेता सिद्दार्थ जाधव प्लॅनेट मराठीच्या "प्लॅनेट टॅलेंट" मध्ये सहभागी झाला. आणि आता त्याच्या पाठोपाठ अभिनेत्री गायत्री दातार देखील सहभागी होत आहे. अल्पावधीत प्रसिद्ध झालेल्या गायत्रीचे अभिनयातील विभिन्नतेचे टॅलेंट "प्लॅनेट टॅलेंट"च्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणण्याचा आमचा प्रयत्न असेल.
-अक्षय बर्दापूरकर (निर्माते, सर्वेसर्वा ‘प्लॅनेट मराठी’, सीएमडी ‘प्लॅनेट मराठी ओटीटी)

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती