डॉ. सलील कुलकर्णी यांच्या आगामी ‘एकदा काय झालं’ चित्रपटाच्या शूटिंगचा मुहूर्त संपन्न

गुरूवार, 26 डिसेंबर 2019 (16:27 IST)
सुमित राघवन, उर्मिला कोठारे, डॉ. मोहन आगाशे, सुहास जोशी, पुष्कर श्रोत्री, राजेश भोसले, प्रतीक कोल्हे, मुक्ता पुणतांबेकर, आकांक्षा आठल्ये आणि रितेश ओहोळ यांच्या प्रमुख भूमिका
 
संगीतकार व गायक डॉ. सलील कुलकर्णी यांची गाणी कायम सदाबहार असतात. पण गाण्याच्या पलिकडे जाऊन सलील यांनी नुकतंच दिग्दर्शनात पदार्पण केलं ते ‘वेडिंगचा शिनेमा’ या मराठी सिनेमातून. या सिनेमाची कथा आणि दिग्दर्शन सलील याचं होतं. सिनेमाने देशात तसंच परदेशात देखील खूप यश मिळवलं. या धमाकेदार मनोरंजनाचं पॅकेज असलेला सिनेमा दिल्यानंतर आता डॉ. सलील कुलकर्णी पुन्हा सज्ज झाले आहेत एक नवीन अनुभव देण्यासाठी. ‘एकदा काय झालं’ या सलील कुलकर्णी यांच्या आगामी सिनेमाची नुकतीच घोषणा करण्यात आली होती. या सिनेमाचं पहिलं-वहिलं पोस्टर सोशल मीडियावरुन लॉन्च केलं गेलं तेव्हापासून या सिनेमाबद्दलची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये सुरु झाली होती.
 
‘एकदा काय झालं’ या चित्रपटाच्या शूटिंगचा मुहूर्त २६ डिसेंबर रोजी पुणे येथे सलील कुलकर्णी यांच्यासह चित्रपटात महत्वाच्या व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अनेक दिग्गज कलाकारांच्या उपस्थित पार पडला. यावेळी या चित्रपटातील कलाकार सुमित राघवन, उर्मिला कोठारे, डॉ. मोहन आगाशे, सुहास जोशी, पुष्कर श्रोत्री, राजेश भोसले, प्रतीक कोल्हे, मुक्ता पुणतांबेकर, आकांक्षा आठल्ये, रितेश ओहोळ, अर्जुन पुर्णपात्रे, अद्वैत वाकचौडे, अद्वैत धुळेकर आणि मेरवान काळे उपस्थित होते. २०२०च्या उन्हाळ्यात हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे.
‘एकदा काय झालं..’ ह्या नावापासूनच या चित्रपटाचे वेगळेपण जाणवते आणि एका अगदी नवीन कोऱ्या विषयावरचा एक संवेदनशील चित्रपट आपल्याला बघायला मिळेल अशी खात्री वाटते. या सिनेमाच्या नुकत्याच रिलीज झालेल्या पोस्टरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाची निर्मिती सिद्धार्थ महादेवन, सौमिल शृंगारपुरे आणि सौमेंदु कुबेर यांच्या शो बॉक्स एंटरटेन्मेंटतर्फे आणि अरुंधती दात्ये, अनुप निमकर, सलील कुलकर्णी आणि नितीन प्रकाश वैद्य यांच्या गजवदन प्रॉडक्शन्स तर्फे होत आहे. पहिल्या सिनेमाप्रमाणेच सलील कुलकर्णी ‘एकदा काय झालं’ मध्येही लेखक, दिग्दर्शक आणि संगीतकार या विविधांगी भूमिकेत रसिकांसमोर येणार आहे. वेडिंगचा शिनेमामधल्या त्याच्या या तिन्ही भूमिकांचं कौतुक झालं होतं.
 
‘एकदा काय झालं’ या सिनेमाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरवर एक लहान मुलगा आणि एका माणसाची प्रतिमा दिसते. त्यावरुन सिनेमा एका बाप-मुलाच्या नात्यावर आधारित असू शकतो असा अंदाज बांधला जाऊ शकतो. पहिल्या सिनेमातली मल्टी स्टारकास्ट आणि त्यातही सिनेमा उत्तम निभावून नेणं खरंच प्रशंसनीय आहे. त्यामुळे हा शिवधनुष्य पेलल्यानंतर सलील कुलकर्णी दुसऱ्या सिनेमात नेमकं कोणत्या आव्हानाला सामोरं जातात आणि कोणता नवीन विषय घेऊन भेटीला येतात त्याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती