रिंकूच्या 'मेकअप'चे प्रतिबिंब

गुरूवार, 26 डिसेंबर 2019 (12:07 IST)
आपल्या खऱ्या चेहऱ्यावर रंगरंगोटी करून समोर आलेला दुसरा चेहरा म्हणजे मेकअप. हा मेकअप केवळ चेहऱ्याचाच असतो असे नाही, हा मेकअप व्यक्तिमत्वाचाही असू शकतो. आता व्यक्तिमत्वाचा मेकअप कसा असेल, हा प्रश्न जर तुमच्या डोक्यात आला असेल तर याचे उत्तर तुम्हाला लवकरच मिळणार आहे. गणेश पंडित दिग्दर्शित 'मेकअप' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'मेकअप'च्या जबरदस्त टिझरनंतर आता या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे.
 
या पोस्टरमध्ये काचेच्या इमारतीजवळ पारंपरिक वेशात उभ्या असणाऱ्या रिंकू राजगुरूचे प्रतिबिंब एका वेगळ्याच वेशात दिसत आहे. कधी कधी माणसाचे प्रतिबिंब हे त्यांच्या मूळ व्यक्तिमत्वापेक्षा जास्त बोलके असते. त्यामुळे समोरची व्यक्तीही संभ्रमात पडते, की नक्की खरं कोण? हे पोस्टर बघून प्रेक्षकांचीही काहीशी अशीच अवस्था झाली असेल. परंतु जास्त विचार करू नका, कारण यात रिंकूचे दोन वेगळे चेहरे दिसणार आहेत. यात समाजासमोर वावरणारा पूर्वीचा म्हणजेच रिंकूचा सोज्वळ, समंजस चेहरा तिच्या स्वतःच्या विश्वात मात्र पूर्णपणे वेगळा आहे. बिनधास्त, बोल्ड, स्पष्टवक्ती, स्वच्छंदी आयुष्य जगणारी अशी तिच्या जगण्याची दुसरी बाजू आहे. परंतु पूर्वीने हा 'मेकअप' का केला असेल, हे मात्र चित्रपट आल्यावरच कळेल.
 
 सोहम रॉकस्टार एंटरटेनमेंट, बाला इंडस्ट्रीज अँड एंटरटेनमेंट प्रा. लि., शेमारू एंटरटेनमेंट लि. निर्मित आणि ग्रीन ॲपल मीडिया प्रस्तुत 'मेकअप' या चित्रपटात रिंकू राजगुरू सोबतच चिन्मय उदगीरकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. दीपक मुकूट, बी. बालाजी राव, हिरेन गाडा, नीरज कुमार बर्मन, अमित सिंग यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून केतन मारू, कलीम खान सहनिर्माता आहेत. गणेश पंडित दिग्दर्शित, लिखित 'मेकअप' चित्रपट ७ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती