'गोष्ट एका पैठणीची'ला सर्वोत्कृष्ट मराठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
शनिवार, 23 जुलै 2022 (10:17 IST)
68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार सूर्या यांना मिळाला आहे. तर तानाजी चित्रपटासाठी अजय देवगण यांना हा पुरस्कार मिळाला आहे. सूर्या आणि अजय देवगण यांना हा पुरस्कार विभागून देण्यात आला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार अपर्णा बालमुरली यांना मिळाला आहे.
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार तुलसीदास ज्युनिअर या चित्रपटाला मिळला आहे.
मराठीतही अनेकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. 'गोष्ट एका पैठणी'ची या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.
'मी वसंतराव' या चित्रपटाला बेस्ट साऊंड डिझाईन हा पुरस्कार मिळाला आहे. तसंच या चित्रपटाला बेस्ट प्लेबॅकचा पुरस्कारही मिळाला आहे.
साधारणपणे मे महिन्यात या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा होते. मात्र कोरोनामुळे या वर्षी घोषणा व्हायला उशीर झाला. शुक्रवारी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत पुरस्कारांची घोषणा झाली.
'गोष्ट एका पैठणी'ची गोष्ट
'गोष्ट एका पैठणीची'ची या चित्रपटाची कथा, संवाद आणि दिग्दर्शन शंतून रोडे यांनी केलंय. शंतनू यांची ही गोष्ट त्यांचं ड्रीम प्रोजक्ट होतं. हा चित्रपट एका स्वप्नाचा नक्षीदार प्रवास असं शंतून म्हणतात.
खरंतर या कथेला मध्यम वर्गातल्या वास्तवाची किनार आहे. प्रत्येकजण आपल्या उराशी एक स्वप्न बाळगून असतो. असंच एक स्वप्न या चित्रपटातल्या नायिकेचं असतं.
मोठ्या कष्टाने बचत करत छोटासा व्यवसाय करणाऱ्या या नायिकेच्या भावविश्वात एक पैठणी कसं घर करते त्याचा हा प्रवास आहे. त्या प्रवासापर्यंत ती पोहचते का? याचं उत्कंठावर्धक चित्रण शंतनू रोडे यांनी केलंय.
गोष्ट एका पैठणीचे दिग्दर्शक शंतनू रोडे यांच्याशी बीबीसी मराठीने प्रतिक्रियेसाठी संपर्क केला तेव्हा त्यांनी आनंद झाल्याचं सांगितलं.
"मला कळतंच नाहीये की काय बोलावं. मी खूप आनंदात आहे. या सिनेमाची प्रोसेस फार अवघड होती, लॉकडाऊनच्या आधी शूटिंग आणि नंतर त्याचं पोस्ट प्रोडक्शन झालंय. त्यामुळे त्यात बराच काळ गेलाय. नंतर हा सिनेमा आला. आणि आता अनपेक्षितपणे हा पुरस्कार जाहीर झालाय. मला अजून डायजेस्ट नाही झालंय," असं त्यांनी सांगितलं.
याच विषयावर सिनेमा करायचं हे कसं सुचलं, त्यावर "एका छोट्याशा घडलेल्या घटनेवर कथा लिहून आम्ही त्यावर सिनेमा केला. एक गोड कथा आम्ही यात मांडली आहे," असं उत्तर शंतनू यांनी दिलं आहे.
या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळेल असं वाटलं होतं का, असा प्रश्न विचारल्यावर मात्र "आपण चांगला सिनेमा बनोवतोय याचा विश्वास होता. पण, काही घडतंय की नाही असं वाटत असताना काहीतरी छान घडलंय," अशी बोलकी प्रतिक्रिया शंतनू यांनी दिलीय.