पालेभाज्यांचे भाव 50 टक्यांनी वाढले

बुधवार, 21 जून 2023 (20:26 IST)
नाशिक : नाशिकमध्ये पालेभाज्यांच्या भावात मोठी वाढ झालेली आहे. काही महिन्यांपूर्वी भाजीपाल्याला भाव नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला रस्त्यावर फेकून देत आंदोलन करण्यात आली आहेत. मात्र आता भाज्याचे दर कडाडले असून सर्वच भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे सर्व सामन्यांच्या खिशाला झळ सोसावी लागणार आहे. गेल्या आठवड्यात कोथिंबीर जुडी 47 ते 50, तर शेपू, मेथी 35 रुपयाला जुडीचा दर होता, मात्र यात वाढ होऊन आज 100 ते 110 रुपयांचा भाव आला आहे.तर कोथिंबीरीसोबतच मेथी, शेपू, पालक या पालेभाज्यांचे देखील दर जवळपास 50 टक्यांनी वाढले आहेत. 
 
नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे नाशिकसह मुंबईच्या अनेक बाजारात नाशिकला भाजीपाला पोहचवला जातो. मात्र यंदा भाजीपाला दर तळ्यात मळ्यात असल्याचे दिसून येत आहे. यंदाच्या वर्षात अनेकदा भाजीपाल्याच्या दरात तफावत आढळून आली. त्यामुळे शेतकऱ्यांना यंदा मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यातच आता कुठे भाजीपाला दरात वाढ होत असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. आता जूनच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत उष्णतेची तीव्रता कायम राहिल्याने पालेभाज्यांसह अन्य कृषीमालाच्या उत्पादनावर विपरित परिणाम झाला आहे. नाशिक कृषी उत्पन्न समितीत मुख्यत्वे पालेभाज्या आणि कोथिंबिरसोबत अन्य काही भाजीपाल्याची आवक घटून दर कमालीचे उंचावले आहेत.
 
दरम्यान नाशिकच्या घाऊक बाजारात कोथिंबिरला प्रती 100 जुड्या सरासरी 4700 रुपये, मेथी 3300, शेपू आणि कांदा पात प्रत्येकी 3500 रुपये दर मिळत आहे. किरकोळ बाजारात हेच दर जवळपास दीड ते दोनपट होत असल्याने गृहिणींचे आर्थिक गणित विस्कटले आहे. दरम्यान पाऊस लांबल्याने आवक जवळपास 60 ते 70 टक्के कमी झाली असून जवळपास एक महिना ही परिस्थिती कायम राहील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती