कडुनिंबाच्या झाडावरून तब्बल अर्धातास ५१ योगासनांचे प्रात्यक्षिके (फोटो)

बुधवार, 21 जून 2023 (19:37 IST)
R S
नाशिक : आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्यातील योग शिक्षक बाळू मोकळ यांनी जगधने वाडा (ता. नांदगाव) येथे सूर्य नमस्कारासह तब्बल अर्धातास ५१ योगासन प्रात्यक्षिके कडुनिंबाच्या झाडावरून करून यंदाची ‘वसुदैव कुटुंबकम’ ही थीम योग दिनाच्या पार्श्वभूमीवर साजरी केली.
 
मानवाला ऑक्सिजन देणारे झाड व झाडाच्या सानिध्यातच म्हणजेच झाडावरच योगा करावा जेणेकरून जास्त थकवा पण येणार नाही आणि आसन चांगलें करता येवू शकते. म्हणून यंदा झाडाची निवड केल्याचे मोकळ यांनी सांगितले. पद्मासन, बंध पद्मासन, सर्वांगासन, हालासन, वक्रासन, अर्ध मतसेंद्रासन, भूनमणासान, त्रिकोनासन, विरासन, वृक्षासन, ताडासान, पवनमुक्त आसन, चक्रासन आदी ५१ योगासनासह ११ वेळा सूर्य नमस्कारही कडुनिंबाच्या झाडावर केले.
 
यापूर्वी दुचाकीवर देखील मोकळ यांनी यापूर्वी ५१ योगासने केली होती..या योगासनांची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये देखील नोंद करण्यात आली आहे. मागील १८ वर्षांपासून ते योग शिक्षण देण्याचे काम करत आहेत. आयुष्मान योजने अंतर्गत योग शिक्षक असलेले बाळू मोकळ हे नांदगाव येथील रहिवासी असून ते सध्या नाशिक येथे स्थायिक आहेत. आतापर्यंत त्यांनी वेगवेगळ्या शाळा, कॉलेज, संस्था आदी ठिकाणी जावून १५० हून अधिक योग कार्यशाळा घेतल्या आहेत. तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांनी योग प्रशिक्षण सुरू केले आहे. आदर्श योग शिक्षक, रुग्णसेवा, नाशिक रत्न, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड आदी पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत. तसेच ३ वेळा राज्यस्तरीय योग स्पर्धेसाठी त्यांची यापूर्वी निवड झालेली आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती