कोल्हापूर : जिह्यातील प्राथमिक शिक्षकांची मुख्य अर्थिक संस्था असलेल्या प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सत्ताधाऱयांसह विरोधकांची दोन पॅनेल मैदानात उतरल्यामुळे चुरशीची तिरंगी लढत होणार आहे. सभासदांशी संपर्क साधण्यामध्ये सध्या सत्ताधारी वरुटे गटाने पूर्ण जिल्हा पिंजून काढला आहे. तर मंगळवारी झालेल्या माघारीनंतर सत्ताधाऱयांना कोणत्या मुद्यांवर कोंडीत पकडायचे याची रणनिती विरोधी आघाडीच्या नेत्यांनी आखली आहे. 3 जुलै रोजी मतदान होणार असल्यामुळे सभासदांपर्यंत पोहोचण्यासाठी तिन्ही पॅनेलच्या उमेदवारांनी पायाला भिंगरी बांधली आहे.
बँकेच्या सत्ताधारी संचालक मंडळाची मुदत दोन वर्षांपूर्वी संपली आहे. कोरोना महामारीमुळे त्यांना दोन वर्षांचा जादा कालावधी मिळाला. निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून गेल्या अडीच ते तीन महिन्यांपासून शिक्षक संघटनांनी निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. बँकेवर पुन्हा आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सत्ताधारी गटाने ताकद पणाला लावली आहे. पुरोगामीचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपलं पुरोगामी समविचारी पॅनेलला शिक्षक समितीमधील तीन प्रमुख पदाधिकारी आणि थोरात गटाचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश कांबळे यांची साथ मिळाल्यामुळे भक्कम बांधणी झाली आहे. तर अनेक शिक्षक संघटनांनी एकत्र येऊन राजर्षी शाहू स्वाभिमानी पॅनेलच्या माध्यमातून आपली ताकद पणाला लावली आहे. शिक्षक नेते जोतीराम पाटील, शिक्षक संघाचे (थोरात गट) जिल्हाध्यक्ष रविकुमार पाटील, सरचिटणीस सुनील पाटील, प्रमोद तैदकर, एक.के.पाटील, रघुनाथ खोत आदी प्रमुख पदाधिकारी शाहू पॅनेलची धुरा सांभाळत आहेत.