मुंबईची लाईफलाईन लोकल ट्रेन वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचं साधन आहे. येथून लांब पल्ल्याच्या देखील गाड्या सुटतात. त्यामुळे इथल्या रेल्वे स्थानकांवर तुफान गर्दी बघायला मिळते तसेच अनेकजण गावी जाणाऱ्या आपल्या नातेवाईकांना सोडण्यासाठी येथे येतात. अशा नागरिकांना प्लॅटफॉर्म तिकीट काढणं अनिवार्य असतं. या तिकीटाचा दर आधी पाच रुपये इतका असायचा नंतर ते दहा रुपये इतकं करण्यात आलं. मात्र आता रेल्वे प्रशासनाने मुंबई आणि उपनगरातील काही महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर पुढच्या 15 दिवसांसाठी रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट हे 50 रुपये इतकं केलं आहे.
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर याबाबत माहिती देत सांगितले की 9 मे 2022 ते 23 मे 2022 या 15 दिवसांसाठी प्लॅटफॉर्म तिकीटच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. यामध्ये दादर, एलटीटी, ठाणे, कल्याण आणि पनवेल या रेल्वे स्थानकांचा समावेश असेल. या रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट हे 10 रुपयांऐवजी 50 रुपयांत मिळेल. ही दरवाढ सध्यातरी पुढच्या 15 दिवसांसाठी असल्याची माहिती मिळत आहे.
प्लॅटफॉर्म तिकीटाच्या दरवाढीमागे हे आहे कारण-
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिलेल्या माहितीनुसार एप्रिल महिन्यात अलार्म चेन पुलिंगच्या तब्बल 332 घटना घडल्या आहेत. ज्यापैकी फक्त 53 घटना या योग्य कारणासाठी घडल्या आहेत तर 269 प्रकरणात आरोपींनी कारण नसताना आपात्कालीन साखळी ओढली. या प्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पण त्यापैकी बऱ्याच आरोपींची ओळख पटलेली नाही त्यामुळे त्यांना पकडणं हे रेल्वे पोलिसांपुढील मोठे आव्हान आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने पकडलेल्या आरोपींकडून 94 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
दरम्यान चेन पुलिंगमुळे रेल्वेच्या वेळांमध्ये बदल झाला तर काही लोकल ट्रेन उशिरा धावल्या. यामुळे लाखो नागरिकांचा वेळ वाया गेला. ही गैरसोय पाहता मध्य रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्मवरील गर्दी कमी करण्यासाठी मुंबईतील काही रेल्वे स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकीटांचा दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 9 मे 2022 ते 23 मे 2022 या 15 दिवसांसाठी सीएसएमटी, दादर, एलटीटी, ठाणे, कल्याण आणि पनवेल या रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीटाचा दर हा 50 रुपये इतका असणार आहे.