नाफेडने खरेदी केलेला कांदा स्थानिक बाजारात येणार नाही

बुधवार, 16 ऑगस्ट 2023 (20:13 IST)
Onion purchased by NAFED  नाफेडने खरेदी केलेला कांदा हा स्थानिक बाजारात येणार नसल्याने कांद्याचे भाव पडणार नाहीत, असा विश्वास केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी व्यक्त केला आहे.
 
केंद्र सरकारने नाफेडने कांदा बाजारात उपलब्ध करून देण्याबाबत सूचना जाहीर केल्यानंतर कांद्याचे भाव मागील काही दिवसांपासून कोसळण्याचे अंदाज बांधून त्या स्वरूपाच्या अफवादेखील पसरवल्या जात होत्या. या सर्वांवर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी सांगितले, की मी स्वतः नाफेडच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे.
 
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या नाफेडच्या वतीने जो कांदा बाजारात आणला जाणार आहे, तो नाशिक नव्हे, तर देशातील विविध राज्यांनी केलेल्या मागणीनुसार त्या राज्यांना कांद्याचा पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे हा कांदा स्थानिक बाजारात येणार नाही.
 
त्यामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याचे भाव पडणार नाहीत, असे स्पष्ट करून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार पुढे म्हणाल्या, की काही हितचिंतक आणि काही विरोधक अशा स्वरूपाच्या अफवा पसरवून शेतकऱ्यांच्या मनामध्ये भीती निर्माण करीत आहेत, जेणेकरून कांद्याचे माहेरघर असलेल्या लासलगाव, पिंपळगाव व अन्य ठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण व्हावे, असे नियोजन केले जात आहे. त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन ना. डॉ. भारती पवार यांनी केले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती