निर्यातक्षम द्राक्षांना “कोरोना’चा फटका

शुक्रवार, 26 मार्च 2021 (08:47 IST)
नाशिक ही राज्यातील द्राक्ष पंढरी समजली जाते सोबतच वाईन कॅपिटल सुद्धा आहे. कोरोना व्हायरसचा फटका निफाड तालुक्‍यातील द्राक्ष उत्पादकांना बसला असून निर्यातक्षम द्राक्षाचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात गडगडले आहेत.१०० ते १२० रुपये किलो दराने निर्यात होणारी द्राक्षे सद्यःस्थितीत १५ ते २० रुपये बाजारभावाने विकली जात आहेत.किलोमागे ७० ते ८० रुपयांचा तोटा द्राक्ष उत्पादकांना सहन करावा लागत आहे.सरकारने द्राक्ष उत्पादकांना अनुदान द्यावे अशी मागणी आता द्राक्ष उत्पादकांच्या वतीने जोर धरू लागली आहे.
 
गेल्या वर्षी कोरोना च्या महामारीमुळे द्राक्ष निर्यातीवर मोठा परिणाम झाला होता.त्या वेळी द्राक्ष उत्पादकांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता या वर्षी सुद्धा कोरोनाचे रुग्ण देशात झपाट्याने वाढू लागल्याने द्राक्ष निर्यातीवर पुन्हा कोरोनाचे संकट पडल्यामुळे एक्‍सपोर्ट कॉलिटीच्या द्राक्षांना २० रुपये किलोप्रमाणे बाजारभाव सद्यःस्थितीत मिळत आहे.
 
द्राक्षाचे एकरी आठ ते दहा टन उत्पन्न निघते परंतु मध्यंतरी अतिवृष्टी आणि गारपिटीने द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते त्यामुळे उत्पन्नात मोठी घट होऊन एकरी सहा टन उत्पन्न मिळत आहे.एक एकराला वर्षभरात मजुरी,खते,औषधे यांच्यासह एकूण चार ते साडेचार लाख रुपये खर्च येतो परंतु बाजारभाव घसरल्याने मोठा तोटा सहन करावा लागत आहे.करोना व्हायरसमुळे बाजारभाव घसरले आहेत.त्याचा फटका द्राक्ष उत्पादकांना बसल्याने सरकारने अनुदान द्यावे अशी मागणी निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांच्या वतीने करण्यात येत आहे
 
द्राक्षाचे माहेरघर असलेल्या निफाड तालुक्यात द्राक्ष हंगामाचा शेवटचा टप्पा सुरू आहे.नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष श्रीलंका,मलेशिया,बांगलादेश,दुबई अशा विविध ठिकाणच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जातात परंतु पुन्हा वाढलेल्या कोरोनाच्या संकटामुळे द्राक्ष निर्यातीवर मोठा परिणाम झाला असल्याने द्राक्ष उत्पादक पुन्हा एकदा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे
 
प्रतिक्रिया
कोरोना व्हायरसचा फटका निफाड तालुक्‍यातील द्राक्ष उत्पादकांना बसला असून निर्यातक्षम द्राक्षाचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात गडगडले आहेत.स्थानिक बाजारात २० ते ३० रुपये किलो दराने द्राक्षांची विक्री होत आहे.कोरोना व्हायरसमुळे बाजारभाव घसरले आहेत.त्याचा फटका द्राक्ष उत्पादकांना बसल्याने सरकारने अनुदान द्यावे.
 
डॉ दत्तात्रय जगताप
द्राक्ष उत्पादक शेतकरी शेळकेवाडी

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती