जगभरात मंदीचे ढग दाटू लागलेले असताना त्याची सर्वाधिक झळ भारतीय ऑटोमोबाईल कंपन्यांना बसू लागल्याचे दिसत आहे. यामुळे सर्वच क्षेत्रांमध्ये खळबऴ उडाली असून केंद्र सरकारही नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न करत आहेत. देशातील मारुती सुझुकी, अशोक लेलँडने कर्मचारी कपात करण्यास सुरूवात केली असताना आता महिंद्रानेही यामध्ये उडी घेतली आहे.
ऑटोमोबाईल सेक्टरशी जोडधंद्यांमध्ये सुमारे ५ लाख नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. जमशेदपूरमध्ये टाटा मोटर्सने उत्पादन घटविले आहे. यामुळे या कंपनीला स्पेअर पार्ट पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी टाळे ठोकले आहे. जवळपास ३० कंपन्या बंद झाल्या आहेत. अशीच काहीशी परिस्थिती इन्शुरन्स, सेवा आदी क्षेत्रात निर्माण झाली आहे.
सोशल मिडीयावर कमालीचे सक्रीय असलेल्या आनंद महिंद्रा यांच्या महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीने कर्मचारी कपात सुरू केली आहे. व्यवस्थापकीय संचालक पवन गोएंका यांनी कोलंबोमध्ये सांगितले की, कंपनीने १ एप्रिलपासून जवळपास १५०० कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. एवढे करूनही जर मंदी सुरूच राहिली तर आणखी कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागणार आहे. फॅक्टरीतील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांपेक्षा डीलर आणि सप्लायरच्या कर्मचाऱ्यांना नोकरी जाण्याचा जास्त धोका आहे.भारतातील पुढील उत्सवी सिझन वाहन उद्योगासाठी खूप महत्वाचा आहे. अन्यथा याचा नकारात्मक परिणाम नोकरी आणि गुंतवणुकीवर होणार असल्याचा इशारा गोएंका यांनी दिला आहे.