धनत्रयोदशीला सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. मात्र, यंदा धनत्रयोदशीच्या तारखेबाबत संभ्रम आहे. याचे कारण या वेळी त्रयोदशी ही तिथी दोन दिवसांची आहे. ही तारीख 22 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 06:02 ते 23 ऑक्टोबर रोजी 06:03 पर्यंत असेल. 22 ऑक्टोबरला धनत्रयोदशी साजरी करणे शुभ असल्याचे जाणकार सांगतात. म्हणजेच धनत्रयोदशीच्या खरेदीला अवघा एक दिवस उरला आहे. चांगली गोष्ट म्हणजे धनत्रयोदशीपूर्वी सोन्याचा भाव 50,000 रुपये प्रति दहा ग्रॅमपर्यंत खाली आला आहे.
एमसीएक्सवर, डिसेंबरमधील डिलिव्हरीसाठी सोने सकाळी 9.45 वाजता 0.42 टक्क्यांनी घसरून 49,933 रुपयांवर होते. चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. चांदीचा भाव 0.93 टक्क्यांनी घसरून 56,125 रुपये प्रति किलोवर होता. ताज्या आकडेवारीनुसार, 22 कॅरेट सोन्याचा एक ग्रॅमचा भाव काल 4,655 रुपयांच्या तुलनेत आज 4,635 रुपयांवर आला आहे. त्याचप्रमाणे 24 कॅरेट सोन्याचा एक ग्रॅमचा भाव कालच्या 5,078 रुपयांच्या तुलनेत 5,056 रुपयांवर घसरला.
गेल्या ट्रेडिंग सत्रात सोन्याचा भाव 50,582 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. मात्र, चांदीचा भाव 101 रुपयांनी वाढून 56,451 रुपये किलो झाला. गेल्या ट्रेडिंग सत्रात तो प्रति किलो 56,350 रुपयांवर बंद झाला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1,630.8 डॉलर प्रति औंस तर चांदीचा भाव 18.46 डॉलर प्रति औंस झाला.