चार महिने दूधाचे दर वाढत असताना ऐन दिवाळीच्या तोंडावर पुन्हा दूधाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाढत्या दराच्या विरोधात ठाणे शहरातील दूध विक्रेते एक दिवसाचा बंद करणार आहे. या बंदच्या माधमयातून दर वाढीचा निषेध केला जाणार आहे. येत्या शुक्रवारी ठाणे शहरात १०० टक्के दूध पुरवठा बंद करणार असल्याचे ठाणे शहर दूध व्यावसायिक कल्याणकारी संघटनेने सांगितले.
गेल्या चार महिन्यांपासून दुधाच्या दरांत वाढ होत चालली आहे. या चार महिन्यांत किमान दहा रुपयांनी वाढ झाली आहे. दूध कंपन्या एकीकडे वाढ करीत असताना दुसरीकडे दूध विक्रेत्यांच्या कमिशनकडे दुर्लक्ष करतात. २०१५ ते २०२२ या कालावधीत आतापर्यंत २० रुपये दुधाच्या दरात वाढविण्यात आले आहे. परंतू २० पैसे देखील कमिशन वाढ आमच्या पदरात मिळालेली नाही अशी खंत संघनेचे सहसचिव पांडुरंग चोडणेकर यांनी व्यक्त केली. २१ ऑक्टोबर पासून पुन्हा एकदा दर वाढविले जाणार आहेत. गायीच्या दूधात २ तर म्हशीच्या दूधात चार रुपयांनी दरवाढ केली जाणार आहे आणि या दरवाढीचा निषेध म्हणून ठाण्यात १०० टक्के दूध विक्री बंद केली जाईल असे ठाणे शहरातील दूध विक्रेत्यांनी सांगितले.