ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये जीडीपी वाढीचा दर ७ टक्के

बुधवार, 1 मार्च 2017 (10:11 IST)
नोटाबंदीचा सकल राष्ट्रीय उत्पादनावर (जीडीपी) फारसा परिणाम झालेला नाही हे दर्शवणारी आकडेवारी जाहीर झाली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर २०१६ या तिमाहीतील सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) वाढीचा दर  ७ टक्के असल्याचे मंगळवारी जाहीर करण्यात आले. विशेष म्हणजे यात नोटाबंदीतून अर्थव्यवस्थेला बसलेल्या झळांचाही समावेश केला असल्याचे केंद्रीय सांख्यिकी संघटनेने म्हटले आहे.
 
अर्थ जगतामधील विश्लेषक संस्था आणि विविध अर्थतज्ज्ञांनी नोटाबंदीमुळे ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनामध्ये लक्षणीय घसरण होईल असा अंदाज वर्तवला होता. या तिमाहीत जीडीपी ६.५ टक्क्यांवर स्थिरावण्याची शक्यता वर्तवली जात होती. या पार्श्वभूमीवर केंद्रीय सांख्यिकी संघटनेने मंगळवारी जाहीर केलेली आकडेवारी मोदी सरकारला दिलासा देणारी आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर २०१६ या तिमाहीतील विकास दर ७ टक्के नोंदविण्यात आला आहे. यापूर्वीच्या तिमाहीत हा विकास दर ७.४ टक्के तर मागील आर्थिक वर्षातील तिमाहीत विकास दर ७.२ टक्के असा होता.

वेबदुनिया वर वाचा