माहिती आहे का ? रेल्वेला 'यातूनही' कोट्यावधीचा महसूल मिळतो

गुरूवार, 21 नोव्हेंबर 2019 (09:32 IST)
रेल्वेची आरक्षित केलेली तिकिटे प्रवाशांनी रद्द केल्यानंतर रेल्वेकडून ठराविक रक्कम कापली जाते. एप्रिल २०१९ पासून अवघ्या सहा महिन्यात देशभरात साडेतीन कोटींहून अधिक तिकिटे रद्द झाली व त्यातून ३ हजार ४२० कोटींहून अधिकचा महसूल जमा झाला. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे. नागपुरातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी याबाबत भारतीय रेल्वेकडे विचारणा केली होती. 
 
मिळालेल्या माहितीनुसार १ एप्रिल २०१९ ते ३० सप्टेंबर २०१९ या सहा महिन्यांच्या कालावधीत एकूण १५ कोटी ५३ लाख ७७ हजार ५१३ तिकिटे काढण्यात आली. यातील सामान्य तिकिटे १२ कोटी ४५ लाख ५३ हजार ६०९ इतकी होती, तर तत्काळ तिकिटांची संख्या ३ कोटी ८ लाख २३ हजार ९०४ इतकी होती. यातून भारतीय रेल्वेला १७, ४५३ कोटी ६० लाख १ हजार ११५ रुपयांचा महसूल मिळाला. तर या कालावधीत ३ कोटी ५० लाख ४५ हजार ८८० तिकिटे रद्द झाली. यासाठी कापण्यात आलेल्या ठराविक रकमेतून भारतीय रेल्वेला ३,२० कोटी ११ लाख ९७ हजार १६८ रुपयांचा फायदा झाला.
 
दरम्यान, एप्रिल २०१७ ते सप्टेंबर २०१९ या ३० महिन्यांच्या कालावधीत देशभरात एकूण ६८ कोटी ६१ लाख ९९ हजार ५६ तिकिटे ‘बुक’ झाली. यातील १४ कोटी ७० लाख ३८ हजार ६८९ तिकिटे तत्काळ होती. एकूण तिकिटांमधून भारतीय रेल्वेला ७७, ९९८ कोटी ७५ लाख ४१ हजार ५१५ रुपयांचा निधी मिळाला. एकूण ‘बुक’ तिकिटांमधून १५ कोटी ६५ लाख ७१ हजार ५७ तिकिटे रद्द करण्यात आली व यातून रेल्वेला १५,१५६ कोटी २६ लाख ७६ हजार ७६५ रुपयांचा महसूल मिळाला.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती