कच्च्या तेलात ऐतिहासिक घसरण, देशावर होणार असा परिणाम

मंगळवार, 21 एप्रिल 2020 (09:47 IST)
करोनानं जगभरात थैमान घातलं आहे म्हणून अनेक देशांमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आले असून त्याचाच परिणाम कच्च्या तेलाच्या किंमतीवरही होताना दिसत आहे. अमेरिकन कच्च्या तेलाच्या किंमतीत ऐतिहासिक घसरण पाहायला मिळाली आहे. अमेरिकन तेलाच्या किंमती इतिहासात प्रथमच शून्यापेक्षा कमी घसरल्याचं पाहायला मिळालं.
 
20 एप्रिल रोजी कच्च्या तेलाच्या किंमतीत एवढी घसरण झाली की शून्यापेक्षाही कमी म्हणजेच -37.56 डॉलर्स प्रति बॅरल इतकी घसरल्याचं पाहायला मिळालं. मे महिन्यात पुरवल्या जाणाऱ्या कच्च्या तेलाच्या किंमतीत ही घट झाली आहे.
 
आंतरराष्ट्रीय बेंचमार्क ब्रेंटमध्ये देखील कच्च्या तेलाच्या किंमतीत 8.9 टक्के घसरण पाहायला मिळाली येथे तेलाची किंमत घसरुन 26 डॉलर प्रति बॅरल झाली आहे.
 
करोनाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाची मागणीत घट आणि स्टोरेजच्या कमीमुळे तेलाच्या किमतीत घसरण पाहायला मिळत आहे. 
 
भारत कच्च्या तेलाची 80 टक्के आयात करतो. आता किंमतीत घसरणीचा फायदा देशाला मिळण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे. याचा भविष्यात ग्राहकांना लाभ मिळू शकतो. कारण अशात पेट्रोल- डिझेलच्या दरात घसरणही होण्याची शक्यता आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती