नवा नियम : 130 रुपये प्रतिमहिना दराने ‘फ्री टू एअर’ चॅनल्स

शनिवार, 17 नोव्हेंबर 2018 (16:05 IST)
भारतीय दूरसंचार विनियामक प्राधिकरणाने (ट्राय) डीटीएच व केबल सेवेसाठी नवी नियमावली तयार केली असून, येत्या 1 जानेवारीपासून तिची अंमलबजावणी होणार आहे. त्यानुसार प्रेक्षकांना आता अवघ्या 130 रुपये प्रतिमहिना दराने शंभर ‘फ्री टू एअर’ चॅनल्स पाहायला मिळणार असून, पे चॅनल्सची किंमतही थेट टीव्ही स्क्रीनवर दिसणार आहे. त्यामुळे डीटीएच व केबल कंपन्यांकडून होणार्‍या ग्राहकांच्या अवाच्या सव्वा लुटीला आळा बसण्याची शक्यता आहे. याशिवाय मोबाइल पोर्टेबिलिटी प्रक्रियाही झटपट व सुलभ होणार आहे. ट्रायचे सचिव एस. के. गुप्‍ता यांनी ही माहिती दिली.
 
आता डीटीएच कंपन्यांना 130 रुपये प्रतिमहिना दराने 100 ‘फ्री टू एअर’ चॅनल्स दाखवावीच लागणार आहेत. ही चॅनल्स लोक निवडू शकणार आहेत. त्याव्यतिरिक्‍त पे चॅनल्स पाहावयाची असल्यास त्यांचे अतिरिक्‍त शुल्क भरून ती पाहता येणार आहेत. पे चॅनल्स दराची फसवणूक रोखली जाणार असून, प्रत्येक चॅनलची किंमत आता थेट टीव्हीच्या स्क्रीनवर झळकणार आहे. डीटीएच व केबलची इन्स्टॉलेशन फी 350 रुपयांपेक्षा, तर अ‍ॅक्टिव्हेशन फी 100 रुपयांपेक्षा अधिक घेता येणार नाही. सर्व्हिस प्रोव्हायडरला सेट टॉप बॉक्सची 3 वर्षांची वॉरंटी व गॅरंटी द्यावी लागणार आहे. या कालावधीत सेट टॉप बॉक्स बिघडल्यास तो दुरुस्त करून वा बदलून द्यावा लागणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती