हवाई नियामक ‘डीजीसीए’ने बोइंग ७३७ मॅक्स ८ विमानाच्या उड्डाणावर बंदी घातली आहे. यामुळे स्पाइसजेटने आपली १४ विमान उड्डाणे रद्द केली. आता आज अर्थात गुरुवारपासून काही अतिरिक्त विमानांची उड्डाणे केली जातील आणि त्यात बोइंग ७३७ मॅक्स ८साठी तिकिटे काढलेल्या प्रवाशांना सामावून घेण्यात येईल, असेही कंपनीने पत्रकात म्हटले आहे. तर उर्वरित प्रवाशांना तिकिटाचे संपूर्ण पैसे परत करण्यात आले आहेत. कंपनीच्या दृष्टीने सुरक्षेला सर्वोच्च महत्त्व आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आम्ही हवाई वाहतूक नियामक आणि विमान उत्पादक कंपनी यांच्याशी बोलत आहोत. तसेच प्रवाशांची अडचण होऊ नये, म्हणून विस्तारा एअरलाइन्सलाही परदेशांसाठी जादा विमाने सोडण्यास डीजीसीएने तात्पुरती परवानगी दिली आहे.