सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीतील विजयानंतर भाजप नेत्यांकडून राणेंचे कौतुक

शनिवार, 1 जानेवारी 2022 (08:26 IST)
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत नारायण राणेंच्या पॅनेलला यश मिळाल्याने भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. भाजपच्या राज्य पातळीवरील मुख्य नेत्यांकडून नारायण राणे यांचं या विजयासाठी अभिनंदन करण्यात येत आहे. आता या निकालाबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणेंचं अभिनंदन करताना महाविकास आघाडीला टोला लगावला आहे.
 
देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत या विजयावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या ट्विटमध्ये ते म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपला दणदणीत विजय मिळाला आहे. सरकारी यंत्रणेचा गैरवापर, पोलिसी दडपशाही, सत्तेची अरेरावी, हे सारे काही झुगारून मतदारांनी लोकशाही निवडली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, रवींद्र चव्हाण तसेच सर्व भाजपा नेते, कार्यकर्ते आणि विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन, असे देवेंद्र फडणवीस यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.
 
फडणवीसांकडून राजन तेलींचं कौतुक आणि सल्ला
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपनं दणदणीत विजय मिळवत महाविकास आघाडीला मोठा झटका दिला आहे. असं असलं तरी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यानंतर तेली यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. याबाबत फडणवीसांनी तेली यांना सल्ला दिलाय. या विजयात राजन तेली यांचीही मोठी मेहनत होती. त्यांचा पराभव झाला असेल. मात्र, त्यांनी खचून जायचं कारण नाही. कारण समोरच्या बाजूला जे प्रत्यक्ष अध्यक्ष होते त्यांचा पराभव झालाय. आम्ही राजन तेली यांना पुन्हा सल्ला देऊ की त्यांनी पुन्हा नव्या दमानं आणि जोमानं कामाला लागलं पाहिजे, असा सल्ला फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिलाय.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती