एअर इंडिया झाली कर्जबाजारी कंपन्यांनी इंधन पुरवठा थांबवला

शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019 (16:32 IST)
कर्जबाजारी झालेल्या एअर इंडिया सरकारी प्रवासी विमान कंपनीला मोठा धक्का इंधन कंपन्यांनी दिला आहे. थकबाकी न भरल्याने तेल कंपन्यांनी देशातील सहा विमानतळांवर एअर इंडियाच्या विमानांसाठीचा इंधन पुरवठा थांबवला आहे. तर दुसरीकडे इंधन पुरवठा थांबला म्हणून एअर इंडियाच्या विमानांच्या उड्डाणावर कोणताही परिणाम नाही असे कंपनीने स्पष्ट केले आहे. 
 
एअर इंडियाचे प्रवक्त्याने माध्यमांना सांगितले की, कंपनीला आर्थिक मदतीशिवाय एअर इंडिया मोठ्या प्रमाणावरील कर्जाचे उत्तरदायित्व हाताळू शकणार नाही. तरीही सध्या आशादायी चित्र असे आहे की, या अर्थिक वर्षातील आमची आर्थिक कामगिरी चांगली झाली असून, कंपनी सध्या तरी फायद्याच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे.
 
दरम्यान, गुरुवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास विविध राज्यांतील तेल कंपन्यांनी देशातील सहा विमानतळांवरील एअर इंडियाच्या विमानांसाठीचा इंधन पुरवठा करणे बंद केले आहे. यामध्ये कोचीन, विशाखापट्टणम, मोहाली, रांची, पुणे या विमानतळांचा समावेश आहे. एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी याची माहिती दिली आहे.
 
एअर इंडियावर ४८,००० कोटींचे कर्ज असून, मागील वर्षी सरकारने एअर इंडियातील ७६ टक्के भाग-भांडवल निर्गुंतवणुकीचा निर्णय घेतला, मात्र, ही भाग-भांडवल विक्री प्रक्रिया अपयशी ठरली आहे. सध्या जेट एअरवेजची उड्डाणे तात्पुरती थांबवण्यात आली आहेत, त्यामुळे  एअर इंडिया ही देशात एकमेव विमान कंपनी आहे जी अमेरिका, युरोपसारख्या लांब पल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय मार्गांवर हवाई सेवा देत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती