नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती मुख्य बाजार आवारात लिलावात कोथिंबिरीला वीस हजार पाचशे रुपये इतका विक्रमी भाव मिळाला आहे. म्हणजेच १ जुडी २०५ रुपयाला, या हंगामातील हा सर्वाधिक दर आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीरची आवक घटल्याने कोथिंबीरला हा विक्रमी भाव मिळाला आहे.
कृषी उपन्न बाजार समितीत नाशिक तालुक्यातील म्हसरूळ मखमलाबाद, दरी, मातोरी, मुंगसरा, गिरणारे, गोवर्धन, दूगाव, धोंडेगाव, सिन्नर, निफाड, दिंडोरी, पेठ, त्रंबकेश्वर तसेच पुण्यातील खेड, मंचर आदी भागातून पालेभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात होते. मात्र यात कोथिंबीरचे प्रमाण घटले आहे.
सोमवारी सायंकाळी पालेभाज्यांचे लिलाव झाले. साईधन कंपनीत पालेभाज्या घेऊन आलेल्या दिंडोरी तालुक्यातील नवळपाडा गावातील शेतकरी विनायक लक्ष्मण वाघीरे हे चायना कोथिंबीर घेऊन आले होते. त्यांच्या कोथिंबीरिस वीस हजार पाचशे रुपये शेकडा बाजार भाव मिळाला. सदर कोथिंबीर नितीन लासुरे या व्यापाऱ्याने घेतली असून मुंबई, गुजरात, सुरत येथील मार्केटला पाठविणार आहेत.
यंदा पावसाचे प्रमाण जास्त होते, तसेच नाशिकमध्ये ढगफुटीचे देखील प्रकार घडले असून यामुळे शेतीमालाचे जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले. या झालेल्या अतिवृष्टी शेतातला माल खराब झाला व त्याचा परिणाम आवकवर झाला. कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीरची आवक घटल्याने यंदा कोथिंबीर जुडीला सर्वाधिक भाव मिळताना दिसत आहे.