अवघ्या शंभर भारतीयांकडे देशाच्या 1/4 संपत्ती!

वेबदुनिया

गुरूवार, 19 नोव्हेंबर 2009 (15:09 IST)
देशातील अब्जाधिशांच्या संख्येत वर्षभरात दुपटीने वाढ झाली असून २७ हून ही संख्या ५४ वर पोहोचली आहे. शिवाय त्यांच्या संपत्तीतही दोन तृतीअंशाने वाढ झाली आहे. देशातील शंभर अतिश्रीमंतांची एकूण संपत्ती एकत्र केली तर ती देशाच्या एकूण सकल उत्पन्नाच्या एक चतुर्थांश भरते.

फोर्ब्जच्या आशिया आवृत्तीने प्रसिद्ध केलेल्या अतिश्रीमंतांच्या यादीतून या बाबी स्पष्ट झाल्या आहेत. गेल्या वर्षी भारतात केवळ २७ अब्जाधिश होते. पण वर्षभरातच ही संख्या ५४ वर जाऊन पोहोचली आहे. दुपटीला केवळ दोनच कमी आहेत. शेअर मार्केट वधारल्याचा हा परिणाम आहे.

मुकेश अंबांनी अर्थातच यादीत पहिल्या क्रमांकावर असून त्यांच्या संपत्तीत ५४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यांच्या नंतर पोलाद सम्राट लक्ष्मी मित्तल असून त्यांची संपत्ती ३० अब्ज अमेरिकन डॉलर्स आहे. तिसर्‍या क्रमांकावर मुकेश यांचे बंधू अनिल असून त्यांची संपत्ती चाळीस टक्क्यांनी वाढली आहे.

फोर्ब्जच्या भारतीय आवृत्तीच्या संपादक नाझनीन कर्मली यांच्या मते, भारतीय धनिकांसाठी आनंददायी दिवस पुन्हा आले आहेत. अर्थव्यवस्था आणि मार्केट योग्य दिशेने जात असेल तर भारतात अब्जाधिशांची संख्या वाढण्यासाठी पोषक वातावरण आहे, हे या वर्षाच्या यादीवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

फोर्ब्जच्या या यादीत फारसा बदल झालेला नाही. फक्त सुनील मित्तल यांचे स्थान चारवरून घसरून आठवर गेले आहेत आणि आठवरचे अझिम प्रेमजी चौथ्या क्रमांकावर आले आहेत.

वेबदुनिया वर वाचा