स्किन केअर रुटीनसाठी कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत? योग्य प्रॉडक्ट कसे निवडायचे?

शनिवार, 2 सप्टेंबर 2023 (09:14 IST)
सुशांत (नाव बदलेलं आहे) माझ्या समोर बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर भरपूर पिंपल्स, डाग होते आणि प्रचंड नैराश्यही.त्याची हिस्ट्री जेव्हा विचारली तेव्हा त्याला पिंपल्स आधीपासून येत होते, पण त्याने एका व्हीडिओमध्ये सेलिब्रिटी इन्फ्लुएन्सरला कुठल्या तरी क्रीमबद्दल बोलताना ऐकलं आणि तेच क्रीम त्यानं आणून लावलं.
 
पण उपाय व्हायच्या ऐवजीच अपायच झाला.
 
खरंतर त्वचा हा आपल्या शरीराचा अतिशय महत्त्वाचं अंग आहे. प्रत्येकाच्या प्रकृतीप्रमाणे त्वचेची काळजी कशी घ्यायची यासंबंधीचे उपायही बदलतात. कारण तुमचं वय, तुमच्या त्वचेचा प्रकार, जीवनशैली, तुम्ही उन्हात किती वेळ राहता, कोणत्या हवामानाच्या प्रदेशात राहता, व्यायाम करता का यासारख्या अनेक गोष्टींवर तुमच्या त्वचेचं आरोग्य आणि त्याची काळजी कशी घ्यायची, हेही त्याच अनुषंगाने बदलतं.
 
त्यामुळे सुशांतप्रमाणेच कुठल्यातरी इन्फ्लुएन्सरचा व्हीडिओ, जाहिरातीत सांगितलेल्या क्रीम्स, ऐकीव माहिती याच्या आधारे त्वचेवर कोणतेही प्रयोग करायला जाऊ नका.
 
त्वचेची काळजी घेण्यासाठी योग्य आहार-विहार गरजेचा आहेच. त्याबरोबरच स्किन केअरसंबंधीच्या बेसिक गोष्टी, योग्य ते स्कीन केअर प्रॉडक्टस कसे निवडावेत तसंच डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा, हे जाणून घेणं आवश्यक आहे.
 
तुमच्या रोजच्या स्किनकेअर रुटीनमध्ये तीन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. सनस्क्रीन, क्लिन्झर, मॉईश्चरायझर.
 
सनस्क्रीन लोशन
सगळ्यात आधी सनस्क्रीनबद्दल जाणून घेऊया.
 
सूर्यप्रकाशातले अल्ट्राव्हायलेट किरण जेव्हा आपल्या त्वचेवर पडतात तेव्हा जे अपाय होतात, ते आधी जाणून घेऊया.
 
सनबर्न किंवा त्वचेची जळजळ होते.
सन अलर्जी
चेहऱ्यावर वांग असेल तर ती वाढणं किंवा वांग नसेल तर ते येणं
चेहऱ्यावर काळे डाग येणं
टॅनिंग म्हणजे त्वचा काळवंडणं
 
अल्ट्राव्हायलेट किरणांमुळे असे अनेक अपाय होतात. त्यामुळेच सनस्क्रीन लावणं हा अत्यंत आवश्यक आहे.
 
सूर्यप्रकाशाच्या सतत संपर्कात आल्यामुळं चेहऱ्यावर सुरकुत्या पडण्याचं प्रमाण वाढतं किंवा त्वचेचं वय वाढण्याची क्रिया वेगाने होते.
 
त्यामुळेच सनस्क्रीन आवश्यक आहे. पण सनस्क्रीनबद्दल अनेक प्रश्न विचारले जातात.
 
मी तर बाहेरच जात नाही तर सनस्क्रीन लावू का? माझं एवढं वय झालेलं नाही, तर मी सनस्क्रीन लावावं का? सनस्क्रीन कुठलं वापरावं?
 
या सगळ्या प्रश्नांची उत्तरं समजून घेऊया.
 
योग्य वयात म्हणजे 20 व्या वर्षी तुम्ही सनस्क्रीन लावलं तर एजिंग साइन पुढे ढकलायला फायदा होतो.
 
आपल्या भारतीय त्वचेला वरदान आहे. ते म्हणजे मुबलक प्रमाणात मेलानीन (Melanin) नावाच्या रंगाच्या पेशी आहेत. म्हणून जेव्हा आपण सूर्यप्रकाशात एक्सपोज होऊन टॅन होतो, तेव्हा आपल्या त्वचेची जळजळ जास्त होत नाही. गौरवर्णियांची त्वचेची जशी जळजळ होते आणि त्वचा लाल होते तशी आपली होत नाही.
 
या टॅनिंगमुळे त्वचेचा कॅन्सर होण्याचं प्रमाण कमी होतं. सनस्क्रीनमुळे हे टॅनिंगही आटोक्यात राहतं.
 
योग्य सनस्क्रीन निवडावं कसं ?
तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही जेल बेस सनस्क्रीन लावायला हवं.
 
तुमची त्वचा जर कोरडी असेल तर लोशन बेस किंवा क्रीम बेस सनस्क्रीन लावायला हवं.
 
'एसपीएफ ' म्हणजे सन्स प्रोटेक्टेड फॅक्टर. हा शब्द तुम्ही सनस्क्रीन लोशनच्या बाटलीवर पाहिला असेल.
 
आपल्या भारतीय त्वचेसाठी 15 ते 40 एवढा 'एसपीएफ ' पुरेसा आहे.
 
सनस्क्रीन कधी लावावं?
सनस्क्रीन रोज लावावं. रात्री नाही पण जेव्हा सूर्यप्रकाश आहे तेव्हा.
 
सकाळी 8-9 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत सनस्क्रीनचा थर चेहेऱ्यावर असला पाहिजे.
 
ज्यांचं काम आउट डोअर आहे, म्हणजे खूप जास्त वेळ सूर्यप्रकाशात राहावं लागत असेल तर फिजिकल सनस्क्रीन म्हणजे ज्या सनस्क्रीनमध्ये औषध आहेत, ती वापरा.
 
झिंक ऑक्ससाईड, टायटेनियम ऑक्ससाईड अशी औषध असलेली फिजिकल सनस्क्रीन लावावी
 
जर तुमचं काम इनडोअर असेल तर कॉम्बिनेशन सनस्क्रीन म्हणजे फिजिकल आणि केमिकल सनस्क्रीन लावायला हरकत नाही.
 
सनस्क्रीन ही तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार लावा. सनस्क्रीन फक्त चेहऱ्याला लावून उपयोग नाही. चेहरा, कान, मान, हातांचा उघडा भाग यांनाही सनस्क्रीन लावले गेलं पाहिजे.
 
क्लिनर्झ कोणते आणि कसे वापरावेत?
चेहरा धुण्यासाठी साबण वापरू की फेसवॉश वापरू असा एक कॉमन प्रश्न विचारला जातो.
 
दोन्हीपैकी काहीही वापरू शकता, पण या गोष्टी वापरताना काही गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत.
 
दिवसातून दोनदा चेहरा धुवा.
 
माझी त्वचा तेलकट आहे, खूप पिंपल्स आहेत, सारखा-सारखा चेहरा धुवायला हवा; असा जर विचार करत असाल तर थांबा. कारण सतत चेहरा धुतल्यामुळं त्वचेचा प्रोटेक्टेड लेयर निघून जातो आणि त्यामुळे अजून पिंपल्स येण्याची शक्यता असते.
 
दिवसातून दोनदा योग्य त्या 'क्लिन्झर' ने चेहरा धुणे योग्य.
आता योग्य ते क्लिन्झर म्हणजे काय?
 
तुम्हाला साबण वापरायचा असेल तर तुम्ही विशिष्ट औषधं असलेले साबण वापरू शकता. जर तुम्हाला पिंपल्स आहेत तर तुम्हाला पिंपल्सचं औषध असलेला, फंगल इन्फेक्शन असेल तर अँटीफंगल औषध असतं असे साबण वापरा.
 
अँटिबायोटिक सोप जे हॉस्पिटलमध्ये हात धुण्यासाठई वापरले जातात, ते तुम्ही अंगाला किंवा चेहऱ्याला लावू नका. कारण त्यामुळे आपल्या त्वचेवर जे आवश्यक जीवाणू असतात, जे त्वचेला संरक्षण देतात ते निघून जातात.
 
त्यामुळे सौम्य साबण ज्याचा पीएच हा त्वचेच्या पीएच एवढा असेल तो वापरा. त्यामध्ये कलर नसावा, भरपूर असं परफ्युम किंवा सुवासिक द्रव्य नसावं.
 
फेसवॉश वापरताना काय काळजी घ्यायची?
फेसवॉशमध्ये फोमिंग आणि नॉन फोमिंग असे दोन प्रकार असतात.
 
तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही फोमिंग फेसवॉश वापरायला हरकत नाहीत. पण या फेसवॉशमध्ये कधी कधी पीलिंग एजंट असतात, काही आम्लं असतात. हे फेसवॉश तुम्ही सकाळी वापरले, तर सूर्यकिरणांच्या संपर्कात येऊन इरिटेशन होऊ शकतं. त्यामुळे अशा प्रकारचे फेस वॉश तुम्ही संध्याकाळी वापरा.
तुमची त्वचा एजिंग असेल किंवा कोरडी असेल; तुम्ही वयाच्या तिशी-चाळिशीत असाल तर तुम्ही नेहमी इम्युलियंट बेस किंवा मॉइश्चरायझर बेस असलेले फेसवॉश वापरु शकता. किंवा तुम्ही नॉन फोमिंग म्हणजे ज्याचा फेस होणार नाही असे 'क्लिन्झर' वापरा.
 
त्वचा धुवताना किंवा क्लिन करताना महिलांनी घ्यायची सर्वात महत्त्वाची काळजी म्हणजे मेकअप काढल्याशिवाय कधीही झोपू नका.
 
मॉइश्चरायझर
मॉश्चईरायझर रोज लावायचं का?
 
हो, मॉईश्चरायझर रोजच लावायचं आहे.
 
त्वचेच्या प्रकारानुसार मॉईश्चरायझर निवडा. तेलकट त्वचा असेल तर वॉटर बेस मॉइश्चरायझर निवडावा. जर तुमची त्वचा तेलकट आणि पिंपल्स येणारी असेल तर अॅक्वा बेस किंवा वॉटर बेस मॉइश्चरायझर जेल वापरायला पाहिजे.
 
जर कोरडी त्वचा असेल तर थोडेसे चिकट मॉइश्चरायझर म्हणजे ज्यामध्ये जास्त इमोलियन्ट औषधं असतात असे मॉइश्चरायझर वापरा.
मॉइश्चरायझर पण दिवसातून दोन वेळा लावा.
 
सकाळी अंघोळ केल्या केल्या पहिल्या तीन ते पाच मिनिटांमध्ये मॉइश्चरायझर लावल्यास तर ते लगेच त्वचेत शोषलं जातं आणि जास्त काळ त्वचेवर टिकतं. त्वचेला संरक्षणही अधिक काळ मिळतं.
 
रात्रीही झोपण्याआधी चेहरा धुवून मॉइश्चरायझर लावावं.
 
जीवनशैली
आता सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे लाइफ स्टाइल म्हणजे जीवनशैली.
 
जीवनशैली आणि त्वचा, त्वचेचं आरोग्य यांचा थेट आणि घनिष्ट संबंध आहे. आता निरोगी जीवनशैली ठेवायची म्हणजे काय करायचं? योग्य व्यायाम, समतोल आहार या दोन गोष्टी निरोगी जीवनशैलीसाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत.
 
रोज थोडासा व्यायाम करायला हवा. तुमचा जॉब बैठा असेल तर व्यायाम जास्त करायला हवा.
 
त्यानंतर समतोल आहार हवा. समतोल आहार म्हणजे कार्बोहायड्रेट्स, स्निग्ध पदार्थ, व्हिटॅमिन, प्रथिनं, जीवनसत्त्वांनी युक्त आहार.
 
साखर शक्यतो बंद करावी. तुम्ही जेवढी साखर खाल तेवढे पिंपल्स वाढणं, एजिंग वाढणं, सुरकुत्या येणं, चेहऱ्यावर बॅक्टेरियल इन्फेक्शन होणं किंवा फंगल्स इन्फेक्शन वाढणं असे अनेक त्रास होऊ शकतात.
 
जंक फूड टाळायचं आहे तसं साखरही टाळायची आहे. अनेक जण म्हणतात माझा खूप चहा होतो, तर मग चहातील साखर बंद करा.
 
डेअरी प्रॉडक्ट, दुग्धजन्य पदार्थ खाऊन आणि बेकरी प्रॉडक्ट खाऊन त्वचेवरील पिंपल्स वाढतात. त्यामुळे ज्यांना पिंपल्स आहेत त्यांनी केक, पेस्ट्री यासारख्या पदार्थांचं सततच सेवन किंवा अति सेवन टाळावं.
 
या बेसिक गोष्टी पाळल्या तर तुमची त्वचा निरोगी राहील. अर्थात, तुम्हाला त्वचेच्या समस्या येणारच नाहीत असं नाही. त्वचेच्या समस्या सगळ्यांना असतात. सौंदर्यप्रसाधनाच्या जाहिरात करणाऱ्या देखण्या सुंदर मॉडेल्सना असतात आणि अगदी आमच्यासारख्या त्वचारोगतज्ज्ञांनाही. त्यामुळे समस्यांचा न्यूनगंड न बाळगता त्यावर तातडीने योग्य उपचारही घ्या.
 




Published By- Priya Dixit 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती