Pimple, Acne : तुमचा आहार आणि चेहऱ्यावरील मुरूम यांचा काय संबंध आहे?

शुक्रवार, 22 ऑक्टोबर 2021 (13:48 IST)
अंजली महतो,
पिंपल्स किंवा मुरूम लोकांच्या चेहऱ्यावर डाग सोडूनच रजा घेतात. लोक मुरमांच्या डागांनी इतके त्रस्त असतात की यामुळे ते तणाव अथवा नैराश्येचे बळी ठरल्याची अनेक उदाहरणे आहेत.
 
मुरमांनी पीडित लोक आपल्या जेवणात अनेक प्रकारचे बदल करू लागतात.
 
गेल्या काही वर्षांत जगभरात आरोग्यविषयक जागरूकता वाढली आहे. याच कालावधीत मुरुमांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक पदार्थांचा त्याग करणंही वाढलं आहे. पण ही गोष्ट अत्यंत त्रासदायक असते.
 
मी लंडनमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून त्वचारोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. या कालावधीत मी मुरुमांनी पीडित अनेक रुग्ण पाहिले. यामध्ये बहुतांश या महिलाच असतात. मुरमं ही आपल्या सौंदर्यावरचा डाग असल्याचं सतत त्यांना वाटत असतं.
 
अनेकवेळा मोठ्या घराण्यातील महिला पिंपल्सपासून सुटका मिळवण्यासाठी माझ्याकडे येतात. या सुशिक्षित महिलांना आपली त्वचाच नव्हे तर संपूर्ण शरीराचीही तितकीच काळजी असते.
अनेकवेळा या महिलांनी अनेक प्रकारचे घरगुती उपाय केलेले असतात. यामध्ये खाण्यात बदल करण्यापासून ते बाजारात मिळणारे ब्युटी प्रॉडक्टस वापरणं यांचाही समावेश होतो.
 
आहाराशी संबंध काय?
आजच्या घडीला त्वचेच्या देखभालीसाठी ज्या प्रकारे आहारावर जास्त जोर दिला जात आहे, ते त्रासदायक असल्याचं मला वाटतं. याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
 
अनेक रुग्णांनी मला सांगितलं की त्वचेच्या आरोग्यासाठी त्यांनी ग्लुटेन, डेअरी उत्पादन आणि साखर खाणं बंद केलं आहे.
 
यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील डाग दूर होतील, अशी त्यांना अपेक्षा असते.
असे लोक खाण्यासाठी मित्रांसोबत बाहेर जाणं बंद करतात. वाढदिवसांच्या पार्टीत केक खाण्यास नकार देतात. जेवण सोडून देतात. कॉफी पिण्यासाठी स्वच्छ असे कॅफे शोधत असतात. तिथंही ते मोजक्याच पदार्थांना स्पर्श करतात.
 
विशिष्ट अशा पदार्थांमुळे आपली मुरुमांची समस्या आणखी वाढेल, अशी भीती या रुग्णांना असते. पण आपल्या आहाराचा मुरुमांशी थेट संबंध खरंच आहे का? याचा काय पुरावा आहे?
 
गेल्या कित्येक दशकांपासून याबाबत वादविवाद, चर्चा सुरू आहेत. पण अजूनही स्पष्ट असं उत्तर मिळू शकलेलं नाही, हे विशेष.
 
खरं पाहायचं तर या गोष्टीचा शोध लोकांच्या स्मरणशक्तीवर आधारित असतो. त्यांनी आधी काय खाल्ल होतं हेच विचारलं जातं.
 
पण दहा वर्षांपूर्वीचं जाऊ द्या, गेल्या आठवड्यात आपण काय-काय खाल्लं हेच आपल्या लक्षात कधी-कधी नसतं.
 
काय करावं?
मुरुमांचा संबंध साखरेचं प्रमाण जास्त असलेल्या म्हणजेच उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या पदार्थांशी आहे, हे आपण जाणतो.पण त्याचा अर्थ हा नाही की साखर खाणं आपण पूर्णपणे बंद करायला हवं.
साखरेचं समावेश असलेले पदार्थ सांभाळून खावेत, असा सल्ला मी याबाबत देईन.
 
ते तुमच्या त्वचेसाठीही चांगलं असेल. तर बाकीच्या आरोग्यासाठीही ते योग्य राहील.
 
डेअरी उत्पादनांचा पिंपल्ससोबत संबंध असल्याचा दावा तर आणखीनच कमकुवत आहे.
 
काही डेअरी उत्पादनांच्या सेवनाने पिंपल्स येऊ शकतात. पण प्रत्येक पदार्थामुळे ती अडचण येईल, असं नाही.
 
विशेष म्हणजे लो-फॅट उत्पादन तर फुल-क्रिम उत्पादनांपेक्षाही जास्त धोकादायक ठरू शकतात.
 
ब्रिटन किंवा अमेरिकेत पिंपल्सपासून वाचण्यासाठी डेअरी उत्पादन खाऊ नये, अशी कोणतीच सूचना नाही.
 
उलट, पूर्णपणे शाकाहाही सकस आहाराचं सेवन करूनही मुरुमांना तोंड द्यावा लागलेले अनेक रुग्ण मी स्वतः पाहिले आहेत.
 
मुरमांचा गुणसूत्रांशी संबंध
जेवणाबाबतची सगळी पथ्ये पाळूनही अनेक लोक पिंपल्सनी त्रस्त असतात.
 
कोणत्याही आजारासाठी विशिष्ट पदार्थांना दोष देण्यात काही अर्थ नाही. मुरमांच्या बाबतही तसंच काहीसं आहे.
मुरुम होण्याची अनेक कारणे असतात. एखादा विशिष्ट पदार्थ खाल्ल्यामुळेच मुरुम होतात, असं नसतं. यामध्ये हार्मोन्स (संप्रेरक) यांच्यापासून कौटुंबिक गुणसूत्रंही कारणीभूत असू शकतात.
 
आहाराव्यतिरिक्त गेल्या काही दिवसांत आणखी एक प्रकार खूपच वाढला आहे.
 
एखाद्या व्यक्तीला टिक्की-चाट किंवा आईस्क्रीम खाताना पाहून रोखलं जातं. काय खावं आणि काय खाऊ नये याबाबतचे सल्ले लोक न मागता त्या व्यक्तीला देऊ लागतात.
 
सोशल मीडियावरही तुम्ही पिझ्झासोबत एखादा फोटो टाका. लोक म्हणतील, पिझ्झा खाशील तर पिंपल्स येणारच...
 
याशिवाय चॉकलेट खाण्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातो. पण असं करणं योग्य नाही.
 
खरं तर आपण सध्या अशा जगात राहत आहोत, जिथं माहितीची कोणतीच कमतरता नाही.
सोशल मीडियापासून ते वृत्तपत्रांपर्यंत माहितीचा महापूर उपलब्ध असतो.
 
पण वीस वर्षांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती.
 
सल्ला देणारा व्यक्ती कोण आहे, हेसुद्धा पाहायला हवं. तो व्यक्ती कुणी वैद्य-हकीम आहे, त्वचारोगतज्ज्ञ आहे की आणखी कोण, याची खात्री तर करून घ्या.
 
समजा, तुमच्या चेहऱ्यावर डाग आहेत. तुम्हाला लोकांपासून तोंड लपवावं लागत असल्यास तुम्ही एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरकडेच जाणं योग्य असतं.
 
याविषयी ऐकीव गोष्टीवर कधीच विश्वास ठेवू नका.
 
एखादा उपाय एखाद्या व्यक्तीवर उपयोगी ठरला. तर तो आपल्यासाठीही उपयोगी ठरेल, असं सांगता येत नाही.
 
आपल्या प्रत्येकाचा डीएनए वेगळा असतो. आपली पार्श्वभूमी, गुणसूत्रे वेगळी असते. त्यामुळे आपल्या सर्वांच्या शरीराची संरचना वेगळी आहे.
 
पिंपल्समुळे लोकांच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचं मी अनेकवेळा पाहिलं आहे.
 
लोक चिंताग्रस्त असतात. डिप्रेशन आणि एकटेपणा यांचा बळी ते ठरण्याची शक्यता असते. अशा लोकांना आहारात बदल करण्याचा सल्ला देणं म्हणजे त्यांचा त्रास आणखी वाढवण्याप्रमाणेच आहेत.परंतु, सोशल मीडियापासून मेनस्ट्रिम मीडियापर्यंत याच गोष्टी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे.
 
आपल्या आहाराचा परिणाम चांगल्या आरोग्याशी असतो, त्वचेचाही त्यामध्ये समावेश असतो याबाबत दुमत नाही.
 
पण कधी-कधी आईस्क्रीम, चॉकलेट किंवा तळलेले पदार्थ खाणं इतकं वाईटही नाही.
 
यात लाज वाटण्यासारखं काही नाही. अशा गोष्टींमुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. लोक सार्वजनिक ठिकाणी गोड पदार्थ खाणं टाळू लागतात. जेवणाबाबत ते विनाकारण चिंताग्रस्त होतात.
 
या समस्येवर तोडगा काय?
तुम्ही मुरुमांनी त्रस्त असाल तर सर्वात आधी तुम्ही डॉक्टरांची मदत घ्या.
 
तुमचे आप्तस्वकीय एखादा पदार्थ खाणं टाळू लागले आहेत, तर आधी त्यांच्याशी संवाद साधा. त्यांना तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला द्या.
 
तुमच्या डॉक्टरांना तुम्ही तुमच्या आहाराबाबतही सगळ्या गोष्टी सांगा. आवश्यक असल्यास आहारतज्ज्ञ किंवा मानसोपचार तज्ज्ञ यांचीही भेट तुम्ही घेऊ शकता.
 
जेवण चांगलं किंवा वाईट असं नसतं. चांगला आणि सकस आहार तुमच्या निरोगी त्वचेसाठी नेहमीच गरजेचा असतो.
 
आपला आहार नेहमीच परिपूर्ण असायला हवा. तेव्हाच चांगला परिणाम दिसून येतो. दरम्यान, कधी-कधी चॉकलेट खाल्ल्यामुळे फारसा काही फरक पडत नाही, हे लक्षात असू द्या.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती