आता मेकअप करणे ही एका विशिष्ट वर्गाची संस्कृती राहिलेली नाही. मध्यमवर्गातील महिलांची पावलेही ब्युटीपार्लरच्या दिशेने जाऊ लागली आहेत. फेशियल करून चेहर्यावरची चमक कायम ठेवण्याचा नवा ट्रेंड आला आहे. एखाद्या कार्यक्रमासाठी फेशियल करणे यात काही नवे नाही. पण काही महिला आता रोज फेशियल करायला लागल्या आहेत. परंतु, हे करताना काही काळजी घेणे गरजेचे आहे. फेशियलमुळे काही महिलांना त्वचेचे आजारही झाल्याची उदाहरणे आहेत.
फेशियल केल्याने चेहर्यावरची कांती वाढते. म्हणून पुरूषही फेशियल करायला लागले आहेत. फेशियल केल्याने चेहर्याची मालिशही होते. शरीरात रक्तसंचार सुरळीत होतो. वाढत्या वयानुसार चेहर्यावर जाणवणार्या सुरकुत्याचे प्रमाणही कमी होते. चेहरा तेजस्वी होतो.
परंतु कुठल्याही गोष्टीचा अतिरेक चांगला नसतो हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. वारंवार फेशियल केल्याने त्याचा विपरित परिणाम नाजूक चेहर्यावर होत असतो. फेशियल केल्याने चेहरा उजळतो म्हणून रोज फेशियल केले पाहिजे, असे नाही. महिन्यातून एकदा किंवा दोनदा फेशियल जरूर करा. फेशियल करण्याचेही एक सुत्र आहे. चेहर्यावरील त्वचेचे सेल्स टर्नओवर सायकल 28 दिवसांचे असते. त्यानंतर मृत पेशी चेहऱ्यावर येतात. या पेशी घालविण्यासाठी महिन्यातून एक-दोनदा फेशियल करायला हरकत नाही.
दररोज किंवा आठवड्यातून एकदा-दोनदा फेशियल केल्याने काहीच फायदा होत नाही. उलट चेहर्यावरील नाजुक त्वचेला इजा पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे फेशियल करताना अतिरेक होऊ देऊ नका.