आधुनिक कर्मयोगी पाठशाळेचे संस्थापक हरपले

पद्यविभूषण बाबा आमटे यांच्या निधनाने सक्रिय कर्मयोगी व कर्मयोगाच्या आधुनिक पाठशाळेचे संस्थापक काळाच्या पडद्याआड गेले आहेत अशा शब्दात महसूलमंत्री नारायण राणे यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.

आपल्या शोकसंदेशात ते पुढे म्हणतात की, समाजातील दीनदुबळ्यांच्या सेवेसाठी, विशेषत: कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी बाबांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. संपूर्ण देशात पदयात्रेसह अनेक जनआंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन भारत जोडो सारख्या चळवळीतून राष्ट्रीय एकात्मता जागृत ठेवण्यासाठी ते सतत कार्यशील राहिले. वारसा हक्काने आलेली संपन्नता आणि वकिलीची पदवी असूनही सुखासीनता सोडून आनंदवनच्या माध्यमातून ते दीनदुबळ्यांच्या सेवेसाठी कार्यरत राहिले. त्यांच्या या महान कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावरही मॅगेसेसे सारख्या असंख्य पुरस्कारांनी प्रशंसा झाली.

या थोर समाजसेवकाच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरुन येण्यासारखी नसली तरी त्यांचे कुटुंबिय त्यांचा जनसेवेचा वारसा पुढे नेतील याची खात्री आहे.

वेबदुनिया वर वाचा