“सुप्रीम कोर्टाने मोठ्या घटनापीठाकडे जाण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र ती देताना अनपेक्षितपणे नोकरी आणि शिक्षणात कायद्याच्या अमलबजावणीला स्थगिती दिली असून एक संभ्रम निर्माण झाला आहे. दोन्ही सभागृहाच्या विरोधी नेत्यांशी यासंदर्भात चर्चा केली. काही दिवसांपूर्वी याचिका करणारे आणि त्यांच्या वकिलांशी चर्चा झाली. जी समिती नेमली आहे ती विविध तज्ञांसोबत चर्चा करत आहे,” अशी माहिती उद्धव ठाकरेंनी यावेळी बोलताना दिली.
“आम्ही एक मार्ग, एक दिशा ठरवण्याच्या दिशेने आलो आहोत. विरोधी पक्षांशी चर्चा केल्यानंतर एका गोष्टीचं समाधान आहे ते म्हणजे त्यांनी पुन्हा एकदा सरकारसोबत आहोत हे वचन दिलं आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय सर्व पक्षांनी एकमताने घेतला होता. आरक्षण देण्यासाठी सर्वजण वचनबद्द आहोत. बैठकीत पुढील न्यायालयीन लढाई कशी करायची आणि त्याचसोबत जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत मराठा समजातील तरुण, तरुणींना काय दिलासा द्यायचा हादेखील प्रश्न होता. आम्ही सरकार म्हणून काही गोष्टी निश्चित केल्या आहेत,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“विरोधी पक्षातील नेत्यांशी बोललो तेव्हा त्यांच्याही सारख्याच सूचना आल्या आहेत. या सगळ्या सूचना एकत्र करुन उद्या किंवा परवा निर्णय जाहीर करु. सर्व सूचना एकत्र करुन, कायदेतज्ञांशी चर्चा करुन सरकार पुढील पाऊल टाकलं जाईल,” असं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं.