नाशिकमध्ये समर्थनार्थ महामोर्चा

सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 (10:17 IST)
मोर्चात कुठलीही घोषणाबाजी नाही
नाशिकमध्ये काही दिवसापूर्वी मराठा क्रांती मोर्चा यशस्वीरित्या पार पडला. आता याच धर्तीवर मोठ्या नियोजनानंतर पुन्हा एकदा अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करू नये या प्रमुख मागणीसाठी शहरातून महामोर्चा काढण्यात आला. यावेळी लाखोंच्यासंख्येने लोक सहभागी झाले होते. यात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. विशेष म्हणजे मोर्चात कुठलीही घोषणाबाजी करण्यात आली नाही. दुसरीकडे मोर्चासाठी तालुक्यांच्या ठिकाणाहून लोकांनी गर्दी केली होती. त्यामुळे सर्व प्रमुख रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. तर मोर्चात सहभागी झालेल्या लोकांनी पांढरा पोशाख आणि हातात निळे झेंडे घेतलेले होते. त्यामुळे संपूर्ण शहर त्याच रंगात रंगून गेलेले दिसले.
 
अँट्रॉसिटी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू नये, यासह विविध ९ मागण्यांसाठी निघणार्‍या शहरात महामोर्चा काढण्यात आला. जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्र व राज्यभरातील बौद्ध, एसी, एसटी, मुस्लीम, सर्व ओबीसी व भटके विमुक्त समाज बांधव यात सहभागी झाले. गेल्या दोन महिन्यांपासूनच नियोजन सुरू होते.  मोर्चासाठी सकाळपासून लोकांनी गर्दी करायला सुरुवात केली होती. साधारपणे सकाळी साडे अकरा वाजता गोल्फ क्लब मैदान येथून बहुजन मोर्चा निघाला. पुढे सीबीएसवरून शिवाजी रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून शालीमार, एमजीरोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदनाने मोर्चाचे विसर्जन झाले. दुपारी सव्वादोनच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. यावेळी पाच महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. मग मोर्चाचे विसर्जन झाले. यावेळी विविध क्रांतीगीते आणि महिलांनी मोर्चाविषयी मत व्यक्त केले. 
 
मोर्चाची ठळक वैशिष्ट्ये
- मोर्चात लहान मुले, बौद्ध भिक्कूंसह डॉक्टर, वकील यांचाही सहभाग  
- मोर्च्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा चित्ररथ आणि गौतम बुद्धांची प्रतिमा सोबत
  समता सैनिक दल आणि महिला.
- मोर्चा पुढे गेल्यानंतर मोर्चा मार्गाची साफसफाईह.
- मोर्चामुळे शहरात मोठी वाहतूक कोंडी याचा फटका बस वाहतुक, पोलिस यंत्रणा, शाळेतील विद्यार्थी यांना बसला.
- गोल्फ क्लबवर बसण्यासाठी जागा नसल्याने अनेकांनी मेळा स्टँडवर बसून भाषणे ऐकली.  

वेबदुनिया वर वाचा