अमळनेरच्या नववर्ष स्वागत यात्रेत मंगल रथाचा सहभाग

बुधवार, 22 मार्च 2023 (23:52 IST)
यात्रेत तब्बल ३० रथ : पुष्पवृष्टी करत केले घरासमोर स्वागत
 
अमळनेर:  हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी अमळनेर  शहरातील विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत प्रबोधन यात्रा काढली. यावेळी नागरिकांनी रथावर पुष्पृष्टीकत स्वागत देखील केले. 
सालाबादप्रमाणे यंदाही अमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्थेच्यावतीने नववर्षाच्या स्वागतासाठी निघालेल्या रथयात्रेत सहभाग नोंदविला होता. ही मंगल रथ यात्रा शहरातील प्रताप मिल येथून काढण्यात आली. रॅलीत सहभागी सेविकाऱ्यांनी पायजमा कुर्ता परिधान केला होता तर गळ्यात टाळ, डोक्यावर टोपी, हातात झेंडा घेत जय जय मंगल, जय हरी मंगल नावाच्या जय घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता. यावेळी कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष एस.एन. पाटील, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त जयश्री साबे,विश्वस्त डी एस सोनवणे विश्वस्त अनिल अहिरराव व सेवेकरी उपस्थितीत होते. या रॅलीत तब्बल ३० विविध सेवाभावी संस्थानी सहभाग नोंदविला होता. स्वामी नारायण मंदिर, सुभाष चौक, दगडी दरवाजामार्गे सराफ बाजार, वाडी चौक, झाडी पोलीस चौकी परिसरातून रॅली काढण्यात आली होती. रॅलीत सामाजिक राजकीय धार्मिक तसेच शाळकरी व महाविद्यालयीन तरुण-तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाली होते. ढोल-ताशे, टाळ- मृदुंग अशा पारंपारिक वाद्यासह डीजेचा समावेश होता. विशेष म्हणजे वारकरी संप्रदायाच्या रॅलीत चिमुकल्यांनी एक पावली नृत्य केले तर महाविद्यालयीन तरुणींनी डोक्यात फेटा घालून वाद्यावर तालावर ठेका घेतला होता. रॅलीच्या स्वागतासाठी महिलांनी घरासमोर आकर्षक रांगोळ्या टाकल्या होत्या तर सामाजिक संस्थांकडून ठिकठिकाणी पाणी, नाश्ता व शीतपेयाची व्यवस्था केली होती.
यांनी नोंदविला सहभाग
हिंदू एकता परिषद, मंगळ ग्रह मंदिर, अमळनेर कॉ.ऑफ अर्बन बँक, अमळनेर नगर परिषद, ब्रम्हकुमारी, स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल पी. बी. भांडारकर महाविद्यालय, सार्वजनिक श्रीराम नवमी मंडळ, मंगला देवी मित्र मंडळ, गजानन महाराज संस्था, बिलियनसी डेव्हलपमेंट, अमळनेर गोशाळा, श्री योगवेदांत सेवा समिती, जैन समाज, सचिन भाऊ खंडारे मित्र मंडळ, सूर्यमुखी सेवा समिती माळी समाज मंडळ, जळगाव पीपल्स बँक, जळगाव जनता बँक, स्वामी नारायण मंडळ, मोठे बाबा स्मृती मंडळ, आर्ट ऑफ लिविंग परिवार, विश्वकर्मा मंडळ, दादावाडी जैन मंदिर, गायत्री शक्तीपीठ, सैनिकी स्कूल आदींनी या रॅलीत सहभाग नोंदविला होता.
चोख पोलीस बंदोबस्त
रॅली शांततेत पार पाडावी, यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. दगडी दरवाजा येथे वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस निरीक्षक विजय शिंदे, पोलीस उपनिरीक्षक आशाताई इंगळे, मिलींद बोरसे, भटू पाठक, सुनील हटकर, निर्मला मोरे, अनिता बडगुजर आदी उपस्थितीत होते.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती