संक्रांतीचा शुभ्रोत्सव

WD
संक्रांत.. नवीन वर्षातील पहिला सण. एकमेकांना तिळगूळ देत गोड गोड बोलण्याचे आवाहन करत साजरा करण्यात येणारा हा गोड सण. नवदांपत्यांना, नुकत्याच जन्मलेल्या बालकांना पहिल्या संक्रांतीला हलव्याचे दागिने घालून हा सण साजरा करण्याची प्रथा आपल्याकडे आहे. दिवाळीत खमंग फराळ बनविला जातो तसा पूर्वीच्या काळात घरातच काटेरी हलवा बनविला जात असे. याबरोबरच मुलांसाठी आणि नववधूसाठी घरातच हलव्याचे दागिने बनविले जात असत. रंगीबेरंगी फुले, काळे मणी आणि काटेरी हलवा गुंफून आकर्षक दागिने तयार केले जात असत. पण, हल्ली रेडीमेडच्या जमान्यात हलव्याचे दागिने बनविण्‍याचे कष्ट कोण करणार त्यामुळे हे दागिनेही रेडीमेड मिळू लागले आहेत.

हलव्याचे दागिने घालण्याची प्रथा प्रामुख्याने ब्राह्मण समाजामध्ये होती. पण, आता सर्वच मराठी घरांमध्ये हलव्याच्या दागिन्यांनी सण साजरा केला जातोय. एवढेच नव्हे तर परप्रांतातील मराठी लोकही तेवढ्याच उत्साहात हलव्यांच्या दागिन्यांची प्रथा जोपासत आहेत. त्यांच्यासाठी परप्रांतीय लोक दागिने घडवत आहेत, हे विशेष.

  हिंदू संस्कृतीत काळा रंग अशुभ मानला जात असला तरी संक्रातीच्या दिवशी काळे कपडे घालण्याची परंपरा आहे. काळ्या रंगावर पांढरेशुभ्र हलव्याचे दागिने अधिकच उठून दिसतात.       
जीन्स आणि टॉपच्या जमान्यातही युवा पिढीने हलव्यांच्या दागिन्यांची परंपरा कायम राखली आहे. नव्या पिढीला आवडतील असे दागिन्यांचे नमुने बनविले जात आहेत. त्यामुळेही कदाचि‍त ही परंपरा टिकून आहे. पूर्वीच्या काळात बांगड्या, कानातले आणि मंगळसूत्र असे दागिने मिळायचे. पण, आता सराफाच्या दुकानात जेवढ्या व्हरायटी मिळतात तेवढ्याच हलव्याच्या दागिन्यांमध्येही मिळू लागल्या आहेत. अगदी नेकलेसपासून ते बाजूबंदपर्यंत शेकडो नमूने मिळत आहेत. नेकलेस, मेखला, नारळ, कर्णफुले, बाजूबंद लहान मुलांसाठी किरीट, हार, बासरी असे प्रकार बनविले जातात. सध्या पॅकेज सिस्टिमचा जमाना असल्याने हलव्यांच्या दागिन्यांचे 'पॅकेज' मिळू लागले आहेत. महिलांसाठी आणि मुलांसाठीचे रेडीमेड सेट मिळत आहेत. यांना चांगली मागणी आहे.

वरकरणी आकर्षक वाटणारे हे दागिने बनविण्याचे काम अत्यंत कठीण आहे. काटेरी हलवा तयार केल्यानंतर त्याला बारीक छिद्र पाडले जाते आणि ते रंगीबेरंगी दो-यामध्ये ओवले जाते. त्यामध्ये क्रेप कागदाची लाल हिरव्या रंगाची फुले-पाने चिकटवली जातात. हलव्याचा चुरा होऊ नये यासाठी हे काम अत्यंत नाजूकपणे करावे लागते. दागिने अधिक आकर्षक दिसण्यासाठी हलव्याला लाल, पिवळा, निळा असे विविध रंग दिला जातो. याचप्रमाणे किरीट, बाजूबंद व इतर दागिने घडविले जातात. काळ्या रंगाच्या कपड्यांवर हे दागिने परिधान केले जातात. हिंदू संस्कृतीत काळा रंग अशुभ मानला जात असला तरी संक्रातीच्या दिवशी काळे कपडे घालण्याची परंपरा आहे. काळ्या रंगावर पांढरेशुभ्र हलव्याचे दागिने अधिकच उठून दिसतात.

  संक्रांतीपूर्वी सुमारे दोन महिने आधी आम्ही दागिने घडविण्याचे काम चालू करतो. थंडी असेल तरच हलव्याला चांगला काटा येतो आणि काटेदार हलव्याचे दागिने शोभून दिसतात.      
हलव्याचे दागिने तयार करण्याची तीन पिढ्यांची परंपरा असणारे सांगलीच्या पटवर्धन बंधूंनी सांगितले, अलीकडच्या काळात सण-उत्सव साजरे करण्‍याचे प्रमाण कमी होताना दिसत असले तरी नव्या पिढीला हलव्याच्या दागिन्यांची क्रेझ आहे म्हणूनच दागिने तयार करण्याची परंपरा आम्हीही खंडीत केलेली नाही. हे दागिने तयार करण्याचे काम अत्यंत कठीण आणि जोखमीचे असते. संक्रांतीपूर्वी सुमारे दोन महिने आधी आम्ही दागिने घडविण्याचे काम चालू करतो. थंडी असेल तरच हलव्याला चांगला काटा येतो आणि काटेदार हलव्याचे दागिने शोभून दिसतात. दागिने तयार करण्यासाठी बराच वेळ लागत असल्याने चांगली मागणी असली तरी त्याप्रमाणात दागिने तयार होत नाहीत. त्यामुळे ग्राहक ऑर्डर देऊन हवे तसे दागिने तयार करून घेतात. यावर्षीही चांगली मागणी आहे. महिलांच्या दागिन्यांचा सेट 150 ते 500 रूपये तर लहान मुलांचा सेट 100 ते 350 रूपयांपर्यंत उपलब्ध असल्याचे ते म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा