शिवाजी महाराजांच्या ''रायगड किल्ल्याला जागतिक दर्जा मिळवण्यात कोणता अडथळा येतोय?'

- सोनल चिटणीस-करंजीकर
शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किल्ले रायगडला जागतिक वारसास्थळाचा दर्जा का नाही मिळू शकत, असाही प्रश्न सातत्याने विचारला जातो.
 
राजस्थानच्या किल्ल्यांप्रमाणे हा दर्जा शिवकिल्ल्यांना का नाही, हा प्रश्न कायम आहे. यावर काँझर्व्हेशन आर्किटेक्ट सोनल चिटणीस-करंजीकर यांनी बीबीसी मराठीसाठी लेख लिहिला होता, तो लेख पुनः प्रकाशित करत आहोत.
 
1818 सालच्या मे महिन्याची सुरुवात होती. वर सूर्य तळपत होता आणि ब्रिटीश सैन्य रायगडापर्यंत येऊन ठेपलं होतं. भेदायला अत्यंत कठीण असलेल्या या किल्ल्यावर अव्याहत तोफगोळ्यांचा मारा करण्याचा निर्णय ब्रिटिशांनी घेतला.
 
किल्ले रायगड तेव्हा सुमारे 500 वर्षांचा होता. बाराव्या शकतात त्याचं 'रासिवटा' असं नाव होतं. पुढे 13व्या शतकात विजयनगर साम्राज्यात त्याचं 'रायरी' असं नामकरण झालं.
 
15व्या शतकात तो बहामनी सुलतानाकडे आणि नंतर निझामशाहीकडे होता. 17 व्या शतकात मुघलांनी तो जिंकला आणि तहात आदिलशाहीला दिला.
 
त्यांच्याकडून 1654च्या सुमारास तो शिवाजी महाराजांनी जिंकला आणि त्याचं 'रायगड'असं नाव ठेवलं. त्याचं महत्त्व ओळखून त्याला राजधानीचा दर्जा दिला. तिथंच शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.
 
पुढे 1689 साली तो मुघलांनी पुन्हा घेतला. औरंगझेब बादशाहीखाली त्याला 'इस्लामगड'असं नाव देण्यात आलं.
 
काही काळ स्थानिक सत्तेकडे राहिल्यानंतर 1733 साली पेशव्यांनी तो जिंकला. आता ब्रिटीश भारतात आले होते आणि पेशवाई संपण्याच्या मार्गावर होती. मे 1818मध्ये रायगड ब्रिटिशांनी जिंकला आणि उद्ध्वस्त केला.
 
रायगडाची दुरवस्था का झाली?
ब्रिटिशांनी केलेल्या तोफांच्या माऱ्यात आधीची बांधकामं नेस्तनाबूत झाली होती. हल्ल्यामुळे लागलेल्या आगीत बराच भाग जळून खाक झाला होता. यात भर म्हणजे 1842मध्ये त्या परिसरात नोंदवलेली अतिवृष्टी आणि 1864मधला भूकंप.
 
एकंदर 1818 ते 1895पर्यंत सुमारे 70 वर्षं रायगडाकडे दुर्लक्ष झालं. नंतर टिळकांनी पुढाकार घेतल्यामुळे आणि ब्रिटिश इंडिया पुरातत्व खात्याकडे काम गेल्यामुळे रायगडाच्या जतनाचं काम सुरू झालं.
 
पुढे हे काम भारतीय पुरातत्व विभागाकडे (ASI) आलं. पण या ऐतिहासिक वारशाचं जतन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी त्यांनी चोख पार पाडली, असं अजिबात म्हणता येणार नाही.
 
माझ्या दृष्टीनं रायगड किल्ला भारतातील मध्ययुगीन दुर्गबांधणीचा उत्तम नमुना आहे. काळाच्या ओघात वेगवेगळ्या राजवटींनी या दुर्गाचा वेगवेगळा उपयोग करून घेतला. टेहळणीची चौकी ते अभेद्य राजधानी असा प्रवास रायगडानं केला.
 
मध्ययुगात जगभरात दुर्ग बांधले गेले. सुरक्षेसाठी दुर्ग हे त्या काळातलं वैशिष्ट्य आहे. जगातल्या प्रत्येक ठिकाणी दुर्ग बांधण्याच्या विविध पद्धती विकसित झाल्या. त्यांचा अभ्यास करून त्या काळातल्या अनेक गोष्टींचा उलगडा होतो.
 
हे किल्ले आज संरक्षणासाठी उपयोगाचे नसले, तरी ते गत काळाची आठवण सांगतात. त्यातून आपण अनेक गोष्टी समजू आणि शिकू शकतो. त्यांचं जतन करणं आपलं आद्य कर्तव्य असलंच पाहिजे.
 
रायगडाचे नेमके नकाशे नाहीत!
आज रायगडाची जबाबदारी ASI या केंद्रीय संस्थेकडे आहे. त्यांच्या कामावर अनेकांनी अनेक वेळा नाराजी व्यक्त केली आहे. रायगडाचं अजूनपर्यंत धड मॅपिंगही करण्यात आलं नाही आहे, हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल.
 
ASIकडे महादरवाजापासून वरचा पठार आहे. ते तेवढ्याच भागावर काम करतात. पण त्याही ठिकाणचे तंतोतंत नकाशे मिळत नाहीत. असतील तर ते आमच्यासारख्या संशोधकांना देत नाहीत.
 
मला वाटतं की रायगडाचा विचार एवढा मर्यादित होऊ नये. त्याचा संपूर्ण घेरा आम्हा इतिहास संशोधकांसाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा परिसर आहे. त्याचा शोध आणि योग्य त्या ठिकाणी उत्खनन झालं पाहिजे. पण हे आजपर्यंत मोजक्याच ठिकाणी झालं आहे.
 
ASI सध्या उघड्या पडलेल्या अवशेषांची स्वच्छता, त्यात उगवणारी झुडपं काढण्याचं काम, पावसाचं पाणी अवशेषांमध्ये झिरपू नये म्हणून डागडुजी करणं, अशी ठराविक कामं करतं. जतन आणि संवर्धनाची कामं नियमित होत नाहीत.
 
जागतिक दर्जा का नाही?
ASIने आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आहे. ते म्हणजे रायगडाला जागतिक वारशाचा दर्जा मिळवण्यासाठीचे प्रयत्न.
 
2013 साली राजस्थानच्या 6 किल्ल्यांचा समावेश वर्ल्ड हेरिटेजच्या यादीत करण्यात आला. पुण्यातलं रायगड स्मारक मंडळ गेली अनेक वर्षं रायगडाला हा दर्जा मिळावा या दृष्टीनं प्रयत्न करत आहे. त्यासाठीचे प्रस्ताव बनवत आहे.
 
जागतिक वारसा म्हणून घोषित होण्यासाठी 6 सांस्कृतिक निकष आहेत -
 
1. मानवी प्रतिभेचा उत्तम नमुना
2. मानवी मूल्यांमध्ये झालेले बदल दाखवणारी वास्तू
3. जिवंत अथवा मृत संस्कृतीचा महत्त्वाचा दाखला देणारी वास्तू
4. मानवी इतिहासाचे टप्पे दाखवणारी वास्तू किंवा वस्तू किंवा क्षेत्र
5. नष्ट होण्याच्या मार्गावर असलेली पारंपरिक मानवी वसाहत
6.असाधारण वैश्विक महत्त्व असलेल्या घटना किंवा परंपरा किंवा कल्पनांशी संबंधित वास्तू
 
दरवर्षी सप्टेंबरर्यंत प्रत्येक राज्य एक सखोल प्रस्ताव बनवून केंद्राकडे पाठवतं. त्यानंतर केंद्र सरकार त्या सर्वांमधून निवडून केवळ एक प्रस्ताव पुढे युनेस्कोकडे पॅरिसला पाठवतं.
 
एव्हाना महाराष्ट्रातल्या 4 ऐतिहासिक वास्तूंना हा जागतिक दर्जा मिळाला आहे - अजिंठा लेण्या, वेरूळच्या लेण्या, मुंबईजवळच्या घारापुरी लेण्या आणि मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस.(पश्चिम घाटाला जैवविविधतेसाठी हा दर्जा मिळाला आहे - त्यात साताऱ्यातलं कासचं पठार येतं.)
 
वर दिलेल्या सर्व 6 निकषांमध्ये रायगड बसतो, याची मला खात्री आहे. पण ते युनेस्कोला पटवून देण्यासाठी त्याचा शिस्तशीर पाठपुरावा करावा लागेल. ही अतिशय काटेकोर आणि वेळखाऊ प्रक्रिया आहे. त्यात सत्ताधाऱ्यांची इच्छाशक्ती देखील आवश्यक आहे.
 
शिवाजी महाराज आणि त्यांचे किल्ले ही काही फक्त महाराष्ट्राची किंवा भारताची शान नाही. तर ती जागतिक महत्त्वाची ठिकाणं आहेत. कारण सह्याद्रीच्या केवळ महाराष्ट्रातल्या खोऱ्यात सुमारे 400 किल्ले बांधलेले आहेत. अशा विशिष्ट भौगोलिक परिसरात एवढ्या संख्येने किल्ले जगात कुठेही नाहीत.
 
यातले सगळे किल्ले शिवाजी महाराजांनी बांधले नसले, तरी त्यांची पुनर्बांधणी केली किंवा त्यांना महत्त्व प्राप्त करून दिलं. या प्रत्येक किल्ल्याचं वेगळेपण आणि महत्त्व आहे. यांमधून महाराजांनी रायगड निवडला, यातूनच त्या किल्ल्याचं त्या काळातलं महत्त्व अधोरेखित होतं.
 
ते जगापर्यंत पोहोचण्यासाठी हा दर्जा मिळणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे सगळ्या जगाला शिवरायांचं इतिहासातलं महत्त्व कळेल. जगातले पर्यटक रायगडावर येऊ शकतील.
 
आणखी एक महत्त्वाची गोष्ट होऊ शकेल - ती म्हणजे युनेस्को शास्त्रशुद्ध पद्धतीनं संवर्धन करण्यासाठी मदत करू शकेल. ज्या पद्धतीनं युरापतले किल्ले जनत केले आहेत, त्याच शिस्तीने किल्ले रायगड जनत करता येईल. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उत्खनन केलं तर इतिहासातले नवे थर सापडू शकतील.
 
राजस्थानमधल्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळावा, यासाठी झटणाऱ्या डॉ. शिखा जैन या काँझर्वेशन आर्किटेक्टची सभा कोल्हापूरच्या छत्रपती संभाजीराजेंच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आली होती. पण रायगड जगाच्या नकाशावर कधी येणार, याचं उत्तर अजून मिळू शकलं नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती