मागास, विकसित यांच्यातील अंतर मिटवू- राहुल गांधी

ND
ND
सध्या देशात दोन प्रकार दिसत आहेत एक खूपच विकसित भाग दिसतो आणि दुसरा मागास व गरीब. या दोन भागातील अंतर कमी करणयासाठी काँग्रेस काम करेल असे प्रतिपादन काँग्रेसचे सरचिटणीस व युवा नेते राहुल गांधी यांनी येथे जाहीर सभेत बोलताना केले. केंद्राप्रमाणे राज्यातही 'आम आदमी'चे सरकार आणा असे आवाहन त्यांनी केले.

येथील काँग्रेस आघाडीच्या प्रचारासाठी एमजीएम शिक्षण संस्थेच्या मैदानावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी राहुल गांधी यांना सभास्थानी येण्याला उशीर होवूनही मोठा जनसमुदाय उपस्थित होता. प्रारंभी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे भाषण झाले. त्यानी मराठवाड्याच्या विकासासाठी काँग्रेसला विजयी करण्यचे आवाहन केले.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, हिंदुस्थान गेल्या पाच वर्षात केंद्रात मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यापासून वेगाने प्रगती करत आहे. या प्रगतीचा जो फायदा आहे तो सर्व सामान्य माणसांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. मी जेथे जातो तेथे विचारतो की सरकारच्या ज्या योजना आहेत त्यापैकी कोणत्या योजनेचा तुम्हाला जास्त लाभ होतो तेव्हा लोक सांगतात की रोजगार हमी योजनेचा जास्त फायदा होतो. आम्ही समाजातील सर्व घटकांना बरोबर घेवून प्रगतीकडे जाण्याचा विचार करत आहोत.

देशाच्या प्रगतीचा फायाचा विचार मांडताना राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेसची विचारधारा ही सर्वसामान्य माणसाची विचारधारा आहे. प्रगतीमुळे होणार्‍या नफ्यातून आम्ही सर्वसामान्य माणसांच्या जीवनात शिक्षण, आरोग्य आणि रोजगार देण्याचा विचार केला आहे. सध्या देशात दोन भाग दिसत आहेत. एक भाग अतिशय प्रगत, श्रीमंत आणि दुसरा मोठा भाग अतिशय गरीब, समस्याग्रस्त. असे चित्र बदलून या दोन भागातील अंतर मिटविण्यासाठी आम्ही काम करणार आहोत. आम्ही माहितीचा कायदा केला, कोट्यवधी शेतकर्‍यांची कर्जे माफ केली. अशाच प्रकारे भविष्यातही वेगाने गरीब माणसांच्या जीवनात प्रगतीचा प्रकाश पोहोचविण्यासाठी काम करायचे आहे. त्यासाठी लोकांनी काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले. या सभेत राजेंद्र दर्डा, चंद्रभान पारखे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार कदिर मौलाना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष केशवराव औताड, विजय दर्डा, संजयसिंग, आदी उपस्थित होते. राजेंद्र दर्डा यांनी सूत्रसंचालन व परिचय करून दिला.

वेबदुनिया वर वाचा