देशाला एकत्र राहूनच प्रगती करायची आहे. म्हणूनच कोणीही कुठेही राहू शकतो, जाऊ शकतो, असे प्रतिपादन कॉंग्रेसचे युवा नेते राहूल गांधी यांनी आज पनवेल येथे झालेल्या सभेत केले. राज ठाकरे यांच्या भूमिपुत्र मुद्याला आव्हान देण्याचा प्रयत्न राहूल यांनी केला.
कॉंग्रेसचे उमेदवार प्रशांत रामशेठ ठाकूर यांच्या प्रचारासाठी राहूल आले होते. त्यांच्या सभेला चांगला प्रतिसाद मिळाला. विशेषतः युवा वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिल्याचे दिसून आले. कॉंग्रेस सरकारने सर्वांना रोजगार दिला. त्यासाठी जात, धर्म आम्ही पाहिलेला नाही. हेही राहूल यांनी आवर्जून सांगितले.
देशाचा काही भाग झपाट्याने विकास साधत आहे आणि उरलेला भाग मागे पडत आहे. ही परिस्थिती काँग्रेसला बदलायची आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला विकासाची फळे मिळाली पाहिजेत, असे त्यांनी नमूद केले.
भाजप प्रणित सरकारने विकासाचा भर कायम `शायनिंग इंडिया' ठेवला. काँग्रेस प्रणित सरकार मात्र सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून `शायनिंग इंडिया' आणि `मागास भारत' या दोहोंना जोडून घेऊन काम करत आहे, असे राहुल म्हणाले