भुजबळांची नाशिकवरील पकड घट्ट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाटेवर असलेले शिवसेनेचे नाशिकचे महापौर विनायक पांडे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आणून पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नाशिकवरची आपली पकड आता अधिकच घट्ट केली आहे. शिवसेनेचे असले तरी महापालिकेत अपक्ष म्हणून निवडून आलेल्या पांडे यांचे महापौरपदही भुजबळांच्या कृपेने शाबूत रहाण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पुतण्या खासदार आणि आपल्याच ऋणात रहाणारा महापौर आणून भुजबळांनी हे महत्त्वाचे सत्तास्थानही गळाला लावले आहे.

दरम्यान, पांडे यांनी आपल्या पक्ष सोडण्याचे खापर स्थानिक पदाधिकार्‍यांवर फोडले आहे. महापालिकेतील कोणताही प्रश्न असो शिवसेनेकडून कायम विरोध होत होता. पदाधिकार्‍यांनाही विकासाची कोणतीच दिशा राहिलेली नाही. त्यांच्या पाय ओढण्याच्या वृत्तीमुळेच आपण राजीनामा दिल्याचे पांडे यांनी सांगितले. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये दाखल झाल्यानंतर पांडे यांनी ते उमेदवार असलेल्या नाशिक पश्चिम या मतदारसंघात त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार नाना महाले यांना पाठिंबा दिला आहे.

पांडे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आणण्यात पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पांडे आधी मनसेच्या वाटेवर होते. पण बहुमताच्या काठावर येऊनही गेल्या वेळी महापालिकेत कॉंग्रेस व राष्ट्रवादी आघाडीला महापौरपद मिळाले नव्हते. ते पांडे यांनी अथक प्रयत्नाने शिवसेना-भाजप युतीकडे खेचून नेले होते. आता हेच पांडे कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या पाठिंब्याच्या जोरावर महापौरपदी रहाण्याची शक्यता आहे. त्यांना राष्ट्रवादीत आणण्याची किमया भुजबळांनी केल्याने आणि त्यांचे महापौरपदही शाबूत राखल्याने पांडे त्यांच्या ऋणात रहाण्याचीच चिन्हे दिसत आहेत.

नाशिकच्या विकासात भुजबळांनी मोठे योगदान दिले असल्याने आपण त्यावरून प्रेरीत होऊन राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे पांडे यांनीही सांगितले आहे. माजी आरोग्यमंत्री व पूर्वाश्रमी भाजपचेचे नेते असलेल्या डॉ. दौलतराव आहेर यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये उडी घेत आपल्या मुलाला उमेदवारी मिळवून दिली. त्यामुळे श्री. पांडे दुखावले. हा मतदारसंघही भाजपला सुटल्याने पांडे यांनी बंडखोरी करत अर्ज भरला होता. त्यावेळीच ते मनसेमध्ये जाण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, भुजबळांनी त्यांना आपल्या गळाला लावत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आणले. आता राष्ट्रवादीत आणल्यामुळे त्यांचे महापौरपदही शाबूत रहाण्याची चिन्हे आहेत.

शिवसेनेत जिल्हाप्रमुख असताना आपण देदिप्यमान कामगिरी केली. जिल्ह्यातील अनेक सत्तापदे शिवसेनेकडे आली. पण सध्या स्थानिक पातळीवर गचाळ राजकारण सुरू असून त्यामुळे मी व्यथित झालो आहे. यासंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रारही केली. परंतु, त्याचाही उपयोग झाला नाही. म्हणूनच आपण पक्ष सोडत असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेनेचे नाशिकमध्ये आतापर्यंत जे जे महापौर झाले त्या सर्वांनी शिवसेना सोडली आहे. यापूर्वी दशरथ पाटील, उत्तमराव ढिकले या दोघांनीही शिवसेना सोडली होती. त्यात आता पांडे यांचे नावही जमा झाले आहे.

वेबदुनिया वर वाचा