राज्यातील १२६ उमेदवारी अर्ज बाद

राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघातील आज झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीत एकूण १२६ जणांचे अर्ज बाद झाले. अकोला, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, सातारा आणि पुणे जिल्ह्यांतील विविध मतदारसंघांतून शुक्रवारी शेवटच्या दिवसापर्यंत अर्ज दाखल करणात आले होते. त्या उमेदवारांच्या अर्जांची शनिवारी छाननी पार पडली.

अर्ज बाद होणार्‍या प्रमुख उमेदवारांमध्ये विदर्भातील अकोला पश्चिममधील विजय देशमुख, पिंपरी मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार ऍड. सुनील वाल्हेकर, कराड दक्षिणमधील डॉ. इंद्रजित मोहिते आणि मदनराव मोहिते यांचा समावेश आहे. उमेदवारी अर्जासोबत एबी अर्ज नाही, कमी सूचक, प्रतिज्ञापत्र कोरे असणे, जातीचा दाखला नसणे आदी कारणांमुळे भुसावळ मतदारसंघातील राहुल तायडे, प्रकाश सरदार, प्रमोद सावकारे, गणेश इंगळे, मनोहर बारसे, संदीप मोहिते या सहा जणांचे अर्ज बाद झाले, तर छाननीनंतर लगेच रवींद्र निकम व पल्लवी सपकाळे या दोन उमेदवारांनी त्यांचे भरलेले अर्ज मागे घेतले.

वेबदुनिया वर वाचा