दिग्गजांना पराभवाचा धक्का

महाराष्ट्र विधानसभेच्या या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला आहे. काही जण पराभवाच्याच मार्गावर आहेत. यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील पंढरपुरातून पराभूत होणार हे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रपतीपुत्र रावसाहेब शेखावत अमरावतीतून बंडखोर सुनील देशमुख यांच्या तुलनेत मागे पडले आहेत. देशमुख विजयी होतील अशी शक्यता आहे.

शिवसेनेचे विरोधी पक्ष नेते रामदास कदम गुहागरमधून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भास्कर कदम यांच्याकडून पराभूत झाले आहेत. येथून विजयी होणार अशी अपेक्षा असलेले भाजपचे बंडखोर डॉ. विनय नातू तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेले आहेत. माहिम मतदारसंघात अत्यंत चुरस आहे. येथे शिवसेनेतून कॉंग्रेसमध्ये गेलेले सदा सरवणकर आघाडीवर असून मनसेचे नितिन सरदेसाई दुसर्‍या क्रमांकावर आहेत. शिवसेनेचे उमेदवार व अभिनेते आदेश बांदेकर तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेले आहेत.

उस्मानाबादमधून डॉ. पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव व विद्यमान राज्यमंत्री राणा जगजितसिंह पाटील हेही पराभवाच्या छायेत आहेत. पवनराजे निंबाळकर यांचे चिरंजीव व शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर विजयाकडे वाटचाल करीत आहेत. जळगाव ग्रामीणमधून शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील ५००० मतांनी मागे आहेत. ज्येष्ठ नेत्या शालिनीताई पाटील, विद्यमान राज्यमंत्री व कॉंग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांनाही पराभव पत्करावा लागला आहे.

विक्रोळी मतदारसंघातून रिडालोसचे उमेदवार व क्रिकेटपटू विनोद कांबळी पराभूत झाले आहेत.

वेबदुनिया वर वाचा