प्रत्येक घटकाच्या विकासाचे राज्य शासनाचे ध्येय - मुख्यमंत्री सर्वसामान्य जनतेच्या विकासाचे ध्येय राज्य शासनाने डोळ्यासमोर ठेवले आहे. त्यासाठी पारदर्शक आणि गतिमान शासन देण्याचा राज्य शासनाने निर्धार केला आहे. यामुळे राज्याचा विकास होण्यास मदत मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त व्यक्त केला आहे.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करून महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यातील जनतेला दिलेल्या संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, राज्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रादेशिक समतोल राखण्यात येईल. आवश्यक सुविधा उपलब्ध करून राज्याच्या प्रत्येक भागाच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे, या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासन गांभीर्याने प्रयत्न करीत आहे.
औद्योगिक, शैक्षणिक, कृषी क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर असला तरी येत्या काळात राज्याला एका अत्युच्च पातळीवर नेण्याचा संकल्प या निमित्ताने करु या, असे मुख्यमंत्र्यांनी संदेशात म्हटले आहे.
महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या शुभेच्छा संदेशात ते म्हणतात, देशातील सर्वात प्रगतीशील आणि पुरोगामी विचारांचे राज्य असा महाराष्ट्राचा लौकिक आहे. महाराष्ट्राच्या हा लौकीक वाढविण्याबरोबरच राज्याच्या सर्वांगीण प्रगतीची घोडदौड कायम ठेवण्यासाठी राज्यातील प्रत्येक नागरिकाने आपले योगदान देण्याची गरज आहे. आपली आतापर्यंतची वाटचाल नेत्रदीपक असली तरी, भविष्यात आपली स्पर्धा ही देशांतर्गत राज्यांशी नसून जगातील प्रगत राष्ट्रांशी आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. त्यासाठी गुणवत्तावाढीचे लक्ष्य ठेवून आपण सर्वांनीच कठोर परिश्रम केले पाहिजेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
राज्यातील काही तालुक्यांमध्ये असलेल्या टंचाई निवारणासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून शासनाच्या या प्रयत्नांना निश्चितच यश मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करुन महाराष्ट्र राज्य स्थापनेसाठी आणि राज्याच्या आतापर्यंतच्या वाटचालीत योगदान देणाऱ्या सर्वांबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.