या परिसराची स्थापत्यशैली प्रशंसनीय आहे. उजवीकडे महाद्वारापर्यंत भक्कम तटबंदी आहे. डावीकडे उंच असा तट आहे. या ठिकाणी तोफा ठेवण्यासाठी स्वतंत्र जागा ठेवण्यात आली आहे. इतिहासावरून असे दिसून येते की शिवरायांनी प्रत्यक्ष हजर राहून याची पुनर्बाधणी करवून घेतली आहे. इथल्या प्रत्येक वास्तुत शिवरायांच्या आठवणी दडलेल्या आहेत.
महाद्वारातून आत गेल्यावर प्रत्यक्ष किल्ल्याला सुरुवात होते. पुढे देवडय़ाचं बांधकाम, डावीकडे तोफ आणि उजवीकडे शिवरायांचा पुतळा आहे. पुढे मोकळ अंगणात हवेशीर कोठार आणि इतर उपयोगी बांधकाम आहे. थोडे पुढे गेल्यावर एका भक्कम बुरुजावर भगवा झेंडा फडकताना दिसतो.
काही अंतर पुढे गेल्यावर सदर, दारू कोठार, शस्त्रागार, धान्य कोठार आणि इतर उपयोगी बांधकाम आहे. या शिवाय राजवाडा, भवानी मातेचं मंदिर, जखिण्याची तोफ, अवाढव्य असा खुबलढा बुरुज, घनची बुरुज, भुयारी मार्ग, घोडय़ांचा पागा, निशाण काठीची छोटी टेकडी दिसते.
गोविंद, मनरंजन, गगन, शिवाजी, सर्जा, व्यंकट, शाह, दर्या, सिखरा, तुटका, वेताळ इत्यादी 27 बुरुज विजय दुर्गाच्या भक्कमतेची साक्ष देतात. युद्धासाठी उपुक्त अशी दूरगामी स्थापत्यशैली पाहताना मती गुंग होते. विजयदुर्ग किल्ल्याचे संपूर्ण बांधकाम जांभ्या दगड आणि विटांच्या सहाय्याने केलेले आढळते.