शहाजीराजे भोसले हे पराक्रम, युद्धप्रसंगीची बुद्धिमत्ता, उत्तम प्रशासन, व स्वतंत्र राज्यकारभार या मूलभूत गुण-कौशल्य असलेले ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व होते.
मालोजी भोसले यांची पत्नी दीपाबाई (उमाबाई)हिच्या पोटी सिंदखेड इथे शहाजी यांचा जन्म झाला. त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या मातोश्री उमाबाईंनी अहमदनगरजवळील शहाशरीफ पीराला नवस बोलल्यामुळे त्यांनी आपल्या दोन्ही मुलांची नावे शहाजी व शरीफजी अशी ठेवली. ते पाच वर्षांचे असतानाच, वडील मालोजी राजे इंदापूरच्या लढाईमध्ये धारातीर्थी पडले. वडीलाच्या मृत्युनंतर शहाजी राजांना जहागिरी देण्यात आली. पुढे सिंदखेडराजा येथील लखुजीराव जाधव यांच्या मुलीशी म्हणजेच जिजाबाईंशी शहाजीराजे यांचा डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये विवाह झाला. कालांतराने जसेजसे शहाजीराजे मोठे होत गेले, तसतशी पराक्रम, राजकारण, मुत्सद्देगिरी या बाबतीत त्यांची कीर्ती वाढत सर्वदूर पसरत गेली.
शहाजी राजे व जिजाऊंना सहा मुले झाली. त्यापैकी दोनच वाचली. त्यात थोरले संभाजी राजे व धाकटे शिवाजी महाराज होत.
भातवडीच्या युद्धात त्यांचे नाव भारतवर्षात दुमदुमले. मुघल शहेनशाहने इ.स.१६२४ लष्कर खानला १.२ लाखाचे सैन्यासह निजामशाही संम्पवण्यासाठी दक्षिणेस पाठविले, त्यास आदिलशहा ८० हजाराचे सैन्य घेऊन मिळाला. शहाजीराजांकडे २० हजाराचे सैन्य होते. त्यातील् १० हजार अहमदनगरच्या रक्षणासाठी ठेऊन, १० हजार त्यांनी स्वत:कडे ठेवले. एवढ्या मोठ्या सैन्याला प्रचंड पाणी लागेल म्हणून मुघल आणि आदिलशाही सैन्याने उत्तर-दक्षिण वहाणाऱ्या मेखरी नदीजवळ भातवडी येथे छावणी उभी केली. एरवी दुष्काळी असलेल्या अहमदनगरला तेव्हा चांगला पाऊस झाला होता. शहाजीराजांनी छावणीच्या उत्तरेस धरणाला असे तडे पाडले, की रात्री झोपलेल्या मुघल आणि आदिलशाही छावणीला काही कळण्यापूर्वीच छावणीची वाताहात झाली. अनेक योद्धे शहाजीराजांचे बंदी झाले.
नंतर निजामशाही वजीर, जहान खानने, निजामाला मारले, आणि शहाजीराजाना निजामशाहीसाठी मिळवले. शहाजहानने दरम्यान निजामशाहीतील सगळ्या पुरुषाना ठार करवले. उद्देश असा की निजामशहीला वारस रहाणार नाही. तेव्हा शहाजीराजानी, निजामाच्या नात्यातील छोट्या मुर्तझाला गादीवर बसवून स्वत: कारभार हाती घेतला, व जणू स्वतःवरच छत्र धारण केले. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील, संगमनेर तालुक्यातील पेमगिरी किल्ल्यावर घडली. त्यांचा हा स्वतंत्र राज्यकारभार जवळजवळ ३ वर्षे टिकला होता. या भातवडीच्या विजयापासून दख्खनच्या राजकारणात शहाजीराजे यांचे महत्त्व वाढले.
शहाजीराजांनी निजामशाहीत एकही वयस्क निजामशहा नसताना एका दहा वर्षाच्या मूर्तजा नावाच्या निजाम वंशातील मुलावर छत्र धरुन स्वातंत्र्याचा पहिला प्रयत्न केला. शहाजी महाराजांच्या या मोहिमेचा बंदोबस्त करण्यासाठी मोगल व आदिलशहांनी त्यांच्या विरोधात मोहिम आखली. जवळपास चार-पाच वर्षे संघर्ष केल्यावर पराभव झाला असतानादेखील रणदौलाखानाच्या मदतीने त्यांना आदिलशाहीची जहागिरी देण्यात आली. पराभव झाला तरी, एक मराठा सरदार राज्य करु शकतो हे दख्खनमधील सरदारामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम शहाजीराजे भोसले यांनी केले.
शहाजीराजांना आदिलशहाने 'फर्जद' हा बहुमान दिला. शहाजी महाराज आदिलशाही राजवटीचे ताबेदार असले तरीही स्वदेश आणि स्वधर्म याविषयी त्यांच्या मनात प्रखर अभिमान जागृत होता. तिकडे शिवाजीच्या वाढत्या कारवायांना पायबंद घालण्यासाठी आदिलशाहीने, मुख्य वजीर नवाब मुस्तफाखान याने बाजी घोरपडे, मंबाजी भोसले, बाजी पवार, बाळाजी हैबतराव, फतहखान, आझमखान यांच्या साहाय्याने शहाजीराजांना दगा देऊन कर्नाटकातील जिंजीजवळ कैद केले. हे कळताच शिवाजी महाराजांनी मुत्सद्दीपणाने राजकारण करत दिल्लीत मोगल सुलतान शहाजहानला एक पत्र पाठवले. स्वतः आपण व आपले पिता शहाजीराजे हे दिल्लीपतीची चाकरी करू इच्छितात असे त्यांनीहिले. या बदल्यात शहाजीराजांची विजापूरच्या कैदेतून मुक्तता करावी ही अट घातली. अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी शहाजीराजांच्या सुटकेसाठी दिल्लीच्या बादशहाला मधाचे बोट लावले होते. हा प्रयत्न यशस्वी ठरला. शहाजीराजांची दि. १६ मे, इ.स. १६४९ रोजी सन्मानपूर्वक सुटका झाली.
शहाजीराजे आपल्या कारकिर्दित निझाम, मुघल आणि आदिल सत्तेत सरदार म्हणून राहिले तरी त्यान्ची महत्त्वाकांक्षा स्वतंत्र राज्य स्थापनेची होती. त्यानी तसा दोनदा प्रयत्न केला, पण त्यास यश नाही आले. त्यान्चे स्वप्न त्यांचे पुत्र शिवाजी (महाराष्ट्र) एकोजी (तन्जावर) यानी प्रत्यक्षात आणले.
शहाजीराजे अतिशय विद्वान, पराक्रमी, धाडसी, दूरदृष्टी व कल्पक होते. राजनीती व समाजशास्त्रात पारंगत होते. शहाजी राजे कर्नाटकासारख्या ठिकाणी १५ ते २० हजारांची फौज बाळगून होते. तेथील जनतेच्या हितासाठी ते अहोरात्र लढत होते. तेथील प्रजा शहाजीराजांना आपला आधारस्तंभ मानत होती. शहाजीराजे व इतर सरदार बेदनूर प्रांताची मोहिम फत्ते करुन होदिगिरी गावी मुक्कामास आले असताना आदिवासी बांधवांनी त्यांना नरभक्षक वाघांनी माणसे मारल्याची तक्रार दिली. तेव्हा महाराज शिकारीसाठी बाहेर पडले असताना त्यांच्या घोड्याचा पाय नाल्यातील वेलीत अडकला आणि घोडा कोसळला. या घटनेत ते २३ जानेवारी १६६४ मध्ये मृत्युमुखी पडले.