सिद्धी, शक्ती आणि यश देणारा सिद्धटेक येथील श्री सिद्धिविनायक

रविवार, 24 ऑगस्ट 2025 (07:30 IST)
Maharashtra Tourism : सिद्धटेक हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात भीमा नदीच्या काठावर वसलेले अष्टविनायकांपैकी एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. हे मंदिर अष्टविनायकांमधील दुसऱ्या क्रमांकाचे आणि उजव्या सोंडेचा एकमेव गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच आख्यायिकेनुसार हा गणपती असलेली संपूर्ण टेकडीच दैवी शक्तीने प्रभावित असून तिच्या सलग २१ दिवस २१ प्रदक्षिणा केल्यास जीवनात अर्धवट राहिलेली, विघ्न बाधित कार्ये सिद्धीस म्हणजे पूर्णत्वास जातात.यासाठी सिद्धटेकची ख्याती आहे. तसेच सिद्धटेक मंदिर हे भक्ती, इतिहास आणि निसर्ग यांचा संगम असलेले एक शक्तिशाली तीर्थस्थान आहे, जिथे गणरायाचे दर्शन भक्तांना आत्मशांती आणि सिद्धी प्रदान करते. 
ALSO READ: ज्ञान व बुद्धीचा अधिपती मोरगावचा मोरेश्वर, महादेवांचा नंदी इथं मयूरेश्वराच्या मंदिराबाहेर
सिद्धिविनायकाची मूर्ती-
सिद्धिविनायकाची मूर्ती स्वयंभू असून ३ फूट उंच आणि २.५ फूट रुंद आहे. मूर्ती उत्तराभिमुख असून सोंड उजवीकडे वळलेली आहे, ज्यामुळे हे मंदिर अत्यंत शक्तिशाली आणि जागृत क्षेत्र मानले जाते. तसेच मंदिराचा गाभारा १५ फूट उंच आणि १० फूट रुंद आहे, काळ्या दगडात बांधलेला आहे. मखर पितळेचे असून, प्रभावळीवर चंद्र, सूर्य, गरुड आणि मध्यभागी नागराजाच्या आकृत्या आहे.
 
सिद्धिविनायक मंदिराचा इतिहास
मंदिराची पुनर्बांधणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केली, तर रस्ता पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी बांधला.
 
पौराणिक कथा-
या मंदिरातील गणेश मूर्तीची सोंड उजवीकडे वळलेली आहे. सामान्यतः गणेशाची सोंड त्याच्या डावीकडे वळविलेली असते. पण असे मानले जाते की उजव्या सोंडेचा गणेश हा खूपच शक्तिशाली आहे, परंतु हे जरी खरे असले तरी त्याला प्रसन्न करणेही तेवढेच कठीण काम आहे.  हे एकमेव असे अष्टविनायक मंदिर आहे जिथे देवतेची सोंड उजवीकडे आहे. परंपरेने, ज्याची सोंड उजवीकडे आहे त्या गणरायाचे नाव "सिद्धी-विनायक" असे ठेवले आहे, सिद्धी देणारा ("सिद्धी, यश", "अलौकिक शक्ती"). सिद्धटेक मंदिर म्हणूनच जागृत क्षेत्र मानले जाते.मुद्गल पुराणात असे वर्णन केलेले आहे की सृष्टीच्या सुरुवातीस, जेव्हा विष्णू त्यांच्या योगनिद्रेत होते त्यावेळी विष्णूच्या नाभीतून एक कमळ उगवले. सृष्टीचा निर्माता-देव ब्रह्मा याच कमळातून उदयास आले. ब्रह्माने विश्वाची निर्मिती सुरू केली असतानाच, मधु आणि कैटभ हे दोन राक्षस विष्णूच्या कानातील घाणीतून उद्भवले. या राक्षसांनी ब्रह्माच्या सृष्टिनिर्मितीच्या प्रक्रियेस अडथळा आणण्यास सुरुवात केली ज्यामुळे साक्षात विष्णूला जागृत करण्यास भाग पाडले .समोरील विनाशकारी दानवांसोबत विष्णू नारायण लढाई लढले खरे पण त्या दानवांचा पराभव करू शकले नाहीत. मग त्यांनी यामागील कारण शिवाला विचारले. शिवाने विष्णूला सांगितले की ते लढाईआधी, शुभ कार्याचा आरंभ असलेल्या आणि कामातील अडथळा, विघ्ने दूर करणाऱ्या देवतेला गणेशाला वंदन करायला विसरले होते आणि त्याचमुळे ते यशस्वी होऊ शकले नाहीत. अखेरीस, विष्णूनी सिद्धटेक येथे तपश्चर्या केली आणि गणरायाला मंत्रमुग्ध केले - "ओम श्री गणेशाय नमः". प्रसन्न झाल्याने,श्री गणरायांनी विष्णूला आशीर्वाद आणि विविध सिद्धी प्राप्त करून दिली. ती मिळवून विष्णू आपल्या लढाईकडे परत आले आणि दोन्ही राक्षसांना ठार मारले. विष्णूने ज्या ठिकाणी सिद्धि घेतली ती जागा सिद्धटेक म्हणून ओळखली जाते.
ALSO READ: सारस बाग गणपती मंदिर पुणे
धार्मिक महत्त्व-
उजव्या सोंडेचा गणपती हा सिद्धी देणारा आणि कार्य पूर्ण करणारा मानला जातो. येथे २१ दिवस सलग २१ प्रदक्षिणा घातल्यास अडथळे दूर होऊन इच्छा पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे. मंदिरात गणेश चतुर्थी, गणेश जयंती, सोमवती अमावास्या आणि विजयादशमीला विशेष उत्सव साजरे होतात. गणेश चतुर्थी आणि जयंतीला तीन दिवस पालखी मिरवणूक निघते.
 
जवळची आकर्षणे-
पेडगाव येथील प्राचीन मंदिरे आणि किल्ला 
राशीन येथील झुलती दीपमाळ आणि देवीचे मंदिर 
भिगवण येथील पक्षी अभयारण्य  
दौंड येथील भैरवनाथ आणि विठ्ठल मंदिर 
 
श्री सिद्धिविनायक सिद्धटेक जावे कसे? 
रेल्वे मार्ग- सिद्धटेक  पासून दौंड जंक्शन १९ किमी असून हे सर्वात जवळचे रेल्वे स्थानक आहे.
रस्ता मार्ग- पुण्याहून सिद्धटेक ९८ किमी अंतरावर आहे. 
विमान मार्ग -सिद्धटेकला जवळचे विमानतळ पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ असून ते २०० किमी अंतरावर आहे. 
ALSO READ: मुंबईतील प्रसिद्ध 5 गणपती पंडाल

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती